
हिंदुस्थानला पहिल्यांदाच महिला वर्ल्ड कप जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱया शफाली वर्माची ‘आयसीसी विमेन्स प्लेयर ऑफ द मंथ’ म्हणून निवड करण्यात आली आहे. नवी मुंबई येथे झालेल्या वर्ल्ड कप अंतिम सामन्यात शफालीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 78 चेंडूंमध्ये 87 धावांची शानदार खेळी साकारली होती. अंतिम लढतीत फलंदाजीसोबतच शफालीने गोलंदाजीतही मोलाचे योगदान देत दोन विकेट्स घेतल्या होत्या. तिच्या या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर हिंदुस्थानने 7 बाद 298 धावसंख्या उभारली होती. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी पराभूत करीत हिंदुस्थानने जगज्जेतेपद पटकावत इतिहास घडविला. या पुरस्काराच्या शर्यतीत शफालीने थायलंडची थिपाचा पुटथावोंग आणि यूएईची ईशा ओझा यांना मागे टाकले.
दरम्यान, पुरुष विभागात हा सन्मान दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फिरकीपटू सायमन हार्मरला देण्यात आला आहे. हिंदुस्थानविरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत हार्मरने अप्रतिम गोलंदाजी करीत सर्वाधिक 17 विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने हिंदुस्थानात तब्बल 25 वर्षांनंतर कसोटी मालिका जिंकत 2-0 असा क्लीन स्वीप केला.
































































