महात्मा गांधींचे नाव असलेली ’मनरेगा’ रद्द, आता विकसित ’भारत जी राम जी’ योजना; चालू अधिवेशनातच विधेयक सादर होणार

महात्मा गांधी यांच्या नावे असलेल्या ’मनरेगा’च्या जागी मोदी सरकार नवी ग्रामीण रोजगार हमी योजना आणणार आहे. ’विकसित भारत जी राम जी’ नावाने ही योजना ओळखली जाणार असून त्या संदर्भातील विधेयक चालू हिवाळी अधिवेशनातच सादर केले जाणार आहे. 

लोकसभा सदस्यांना आज या विधेयकाची प्रत देण्यात आली. 2047 पर्यंत विकसित हिंदुस्थानचे लक्ष्य गाठण्यासाठी ग्रामविकासाचे नवे प्रारूप तयार करण्याचा या योजनेचा उद्देश आहे. मागील 20 वर्षांत मनरेगातून ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांना आधार दिला. मात्र, सामाजिक व आर्थिक बदल लक्षात घेता ही योजना अधिक मजबूत करणे गरजेचे आहे, असे विधेयकात म्हटले आहे. विकसित भारत जी राम जीचे पूर्ण रूप ’विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका मिशन’ असे आहे.

नव्या योजनेत खास काय?

100 ऐवजी 125 दिवसांच्या रोजगाराची हमी

आधीच्या योजनेचा संपूर्ण खर्च पेंद्र सरकार उचलत असे. आता राज्यांना 10 ते 40 टक्के खर्च करावा लागेल.

पेरणी आणि कापणीच्या हंगामात शेतीकामासाठी मजूर मिळावे म्हणून 60 दिवस ही योजना बंद राहणार

विधेयक येण्याआधीच राजकारण तापले!

‘विकसित भारत जी राम जी’ योजनेचे विधेयक लोकसभेत सादर होण्याआधीच यावरून राजकारण तापले आहे. काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. ‘हे नेमके काय चालले आहे? सरकार महात्मा गांधी यांचे नाव का हटवत आहे? महात्मा गांधी हे देशातील, जगातील आणि इतिहासातील सर्वात महान नेत्यांपैकी एक आहेत. असे असताना सरकार हे का करत आहे,’ असा सवाल प्रियंका गांधी यांनी केला.