मी पदावर राहणे योग्य नाही! मेस्सीच्या कार्यक्रमातील राडाप्रकरणी पश्चिम बंगालच्या क्रीडा मंत्र्यांचा राजीनामा

अर्जेंटिनाचा कर्णधार आणि जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनल मेस्सी हिंदुस्थानात आला होता. मेस्सीच्या हिंदुस्थानी दौऱ्याची सुरुवातच वादळी झाली. हजारो रुपये मोजून मेस्सीची एक झलकही पाहता न आल्याने पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामधील सॉल्ट लेक स्टेडियमवर चाहत्यांनी तुफान राडा घातला होता. संतापलेल्या चाहत्यांनी स्टेडियमची तोडफोड केली. खुर्च्या तोडल्या, बाटल्या फेकल्या आणि मिळेल त्या वस्तूंची नासधूस केली होती. याचीच जबाबदारी घेत आता पश्चिम बंगालचे क्रीडा मंत्री अरुप बिस्वाल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

अरुप बिस्वाल यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना याबाबत पत्र लिहिले आहे. मी पदावर राहणे योग्य नाही असे म्हणत बिस्वास यांनी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच निष्पक्ष चौकशीची मागणीही केली. दरम्यान, याप्रकरणी ऑर्गनायझर सताद्रु दत्ता यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याला बिधाननगर न्यायालयाने 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पश्चिम बंगाल सरकारने मेस्सीच्या आगमनानंतर मैदानात झालेल्या राड्याची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ही समिती स्थापन केली असून या समितीचे अध्यक्षपद निवृत्त न्यायमूर्ती असीम कुमार रॉय यांच्याकडे देण्यात आले आहे.

समितीने मंगळवारी सदर घटनेबाबत प्राथमिक अहवालही सादर केला. त्यानंतर काही तासातच अरुप बिस्वास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आल्याची माहिती तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी एक्सवर पोस्ट करत दिली.

पोलीस उपायुक्त निलंबित

दरम्यान, मेस्सीच्या कार्यक्रमातील राडा प्रकरणी मुख्य सचिवांनी पोलीस महासंचालक राजीव कुमार आणि बिधानगरचे पोलीस आयुक्त मुकेश कुमार यांना कारणे दाखवे नोटीस पाठवली असून बिधानगरचे पोलीस उपायुक्तांना निलंबित करण्यात आले आहे.