
शैक्षणिक कामकाजासाठी लागणाऱया सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांसह नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
गेल्या वर्षी 16 ऑक्टोबरपासून मुद्रांक शुल्कात वाढ करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला. यानुसार सर्व व्यवहारांसाठी भराव्या लागणाऱया मुद्रांक शुल्काची रक्कम किमान 100 वा 200 पासून थेट 500 रुपये करण्यात आली. त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांवरदेखील झाला. विद्यार्थ्यांना लागणाऱया वेगवेगळय़ा प्रमाणपत्रांसाठी मुद्रांक शुल्क भरावे लागते. प्रवेश घेताना, परीक्षा अर्ज भरताना किंवा इतर कोणत्याही प्रमाणपत्राची मागणी करताना विद्यार्थ्यांना मुद्रांक शुल्क भरावे लागत होते. आता त्यातून विद्यार्थ्यांची सुटका होणार आहे. यामुळे विद्यार्थी आणि पालकांवरील आर्थिक ताण आता कमी होणार आहे.




























































