
गुजरातच्या अहमदाबादमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बुधवारी (17 डिसेंबर 2025) अहमदाबाद शहरातील प्रमुख 10 शाळांना सकाळच्या सुमरास बॉम्बने उडवण्याच्या धमकीचा ई-मेल आल्याने खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने तात्काळ सुत्र हालवत शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना सुखरुप शाळेच्या बाहेर काढलं आणि तपासाला सुरुवात केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास धमकीचे ई-मेल प्राप्त झाले. दुपारी शाळांमध्ये बॉम्बस्फोट होईल, असं ई-मेलमध्ये लिहिले होते. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ हालचाल करत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढलं आणि दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली. पोलीस अधिकारी डॉ. हर्षद पटेल यांच्या नेतृत्वात पोलीसांच्या टीमने सर्व परिस्थिती हाताळली. श्वान पथके, बॉम्ब निकामी पथके शाळांमध्ये धाडण्यात आली आणि सखोल तपासणी करण्यात आली. सर्व शाळांची कसून तपासणी करण्यात आली, मात्र कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. पोलिसांनी याप्रकरणी कारवाईला सुरुवात केली असून ई-मेल पाठवणाऱ्याचा शोध घेतला जात आहे.

























































