
नाशिक सदनिका घोटाळा राज्याचे माजी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या चांगलाच अंगलट आला आहे. शासकीय कोटय़ातून सदनिका लाटल्याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी हायकोर्टाने आज फेटाळून लावली. स्थगितीस नकार देतानाच न्यायमूर्ती आर. एन. लढ्ढा यांच्या एकलपीठाने कोकाटे यांना अटकेपासून संरक्षण दिले. असे असले तरी माणिकरावांची आमदारकी मात्र धोक्यात आली आहे.
शासकीय कोटय़ातून सदनिका लाटल्याप्रकरणी दंडाधिकारी न्यायालय व नाशिक सत्र न्यायालयाने कोकाटे यांना दोषी ठरवत दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. या शिक्षेला कोकाटे यांनी उच्च न्यायालयात अॅड. अनिकेत निकम यांच्यामार्फत आव्हान दिले असून या याचिकेवर आज शुक्रवारी न्यायमूर्ती आर. एन. लढ्ढा यांच्या एकलपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. सुनावणीवेळी शरद शिंदे, उपंदा कांबळे व अंजली राठोड यांनी ज्येष्ठ वकील मनोज मोहिते, अॅड. श्रद्धा दुबे-पाटील, अॅड. आशीष घबाळे, अॅड. इरा दुबे-पाटील व अॅड. अंकित पाटील यांच्यामार्फत मध्यस्थी अर्ज दाखल करत कोकाटेंच्या अर्जाला जोरदार विरोध केला. कोकाटे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील रवी कदम यांनी युक्तिवाद केला. त्यांनी न्यायालयाला सांगितले की, कोकाटे यांनी शासनाची कोणतीही फसवणूक केलेली नाही. योजनेसाठी 1988-89 साली रीतसर अर्ज केला होता तेव्हा मिळकत कमी होती, मात्र 1993-94 च्या काळातील मिळकत योजनेसाठी नोंदवण्यात आली. याबाबतची कागदपत्रे सादर करूनही कनिष्ठ न्यायालयाने दोषी ठरवले तर सरकारी वकिलांनी माणिकराव कोकाटेंच्या अर्जाला जोरदार विरोध करत याचिका फेटाळून लावण्याची मागणी केली. न्यायालयाने याचिकाकर्ते, तक्रारदार व इतर पक्षकारांचा युक्तिवाद सविस्तर ऐकून घेत कोकाटेंना अंशतः दिलासा दिला. न्यायालयाने एक लाखाच्या जातमुचलक्यावर त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला. मात्र शिक्षेला स्थगिती देण्याची विनंती फेटाळून लावली. त्यामुळे कोकाटेंच्या अडचणी वाढल्या आहेत.
न्यायालयाचे निरीक्षण
केवळ शिक्षा निलंबित केल्यामुळे फौजदारी गुह्यात दोषी ठरलेल्या व्यक्तीला संविधानिक पदावर राहण्याची परवानगी दिल्यास सार्वजनिक सेवेचे गंभीर आणि अपरिमित नुकसान होईल. त्यामुळे लोकशाहीवरील जनतेचा विश्वास कमी होईल. z याप्रकरणी ते आधीच अनेक वर्षे जामिनावर आहेत. सिन्नरमधून कोकाटे पाच वेळा निवडून आले असून त्यांना दिलेली शिक्षा ही दोन वर्षांचीच आहे. त्यांच्या याचिकेवर अंतिम निकाल येत नाही तोपर्यंत त्यांच्या अटकेची आवश्यकता नाही.
कोकाटेंची बायपास करावी लागणार
अटक वॉरंट निघताच माणिकराव कोकाटे हे लीलावती रुग्णालयात दाखल झाले. काल त्यांची अँजिओग्राफी करण्यात आली असून त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये चार गाठी आढळल्याने त्यांनी बायपास पिंवा अँजिओप्लास्टी करणे गरजेचे असल्याचे हृदयरोग तज्ञ डॉ. जलील परकार यांनी सांगितले.
प्रकरण काय
नाशिक शहरातील पॅनडा कॉर्नरसारख्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या अपार्टमेंटमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक करून माणिकराव व त्यांचा भाऊ विजय कोकाटे यांनी दोन सदनिका लाटल्या. मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार योजनेच्या दहा टक्के राखीव कोटय़ातून या सदनिका हडपल्या असून माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याप्रकरणी माणिकराव कोकटेंविरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी नाशिक दंडाधिकारी न्यायालयाने कोकाटे यांना दोषी ठरवत दोन वर्षे तुरुंगवास व 50 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली होती. तर नाशिक सत्र न्यायालयाने दंडाधिकाऱयांनी ठोठावलेली शिक्षा कायम ठेवत कोकाटे यांना दिलासा देण्यास नकार दिला.
सहा वर्षे निवडणूक लढवता येणार नाही
हायकोर्टाने कोकाटे यांची शिक्षा कायम ठेवल्यामुळे त्यांची आमदारकी जाणार आहे. लोकप्रतिनिधित्व कायदा, 1951 च्या कलम 8 (3) नुसार कोणत्याही गुह्यासाठी दोषी ठरलेल्या आणि किमान दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या विधिमंडळाच्या सदस्याला शिक्षेच्या तारखेपासून अपात्र ठरवणे, इतकेच नाही तर सुटकेनंतर पुढील सहा वर्षांच्या कालावधीसाठी त्याला निवडणूक लढण्यास अपात्र करणे अशी तरतूद आहे. या तरतुदीनुसार कोकाटे यांना आमदारकीला मुकावे लागणार आहे.






























































