
रशिया आणि युक्रेन दरम्यान सुरू असलेल्या भीषण युद्धात रशियन सैन्याकडून लढणाऱ्या हिंदुस्थानींबाबत केंद्र सरकारने संसदेत मोठी माहिती दिली आहे. आतापर्यंत २०२ हिंदुस्थानी नागरिक रशियन सशस्त्र दलात भरती झाल्याचा अंदाज असून, त्यापैकी २६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ७ जण बेपत्ता असल्याचे रशियन बाजूने सांगण्यात आले आहे.
खासदार साकेत गोखले आणि रणदीप सिंह सुरजेवाला यांच्या प्रश्नांना उत्तर देताना परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आतापर्यंत ११९ हिंदुस्थानींना रशियन सैन्यातून मुक्त करण्यात यश आले आहे. उर्वरित ५० हिंदुस्थानींच्या लवकरात लवकर सुटकेसाठी सरकारचे प्रयत्न अद्याप सुरू आहेत.
मृतांची ओळख पटवण्यासाठी ‘डीएनए’ (DNA) चाचणी परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, १० मृत हिंदुस्थानीयांचे पार्थिव मायदेशी आणण्यात आले आहे, तर दोघांवर स्थानिक पातळीवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. मृतांची किंवा बेपत्ता असलेल्यांची ओळख पटवण्यासाठी १८ हिंदुस्थानी कुटुंबांच्या रक्ताचे नमुने (DNA samples) रशियन प्रशासनाकडे सोपवण्यात आले आहेत.
फसवणुकीला बळी पडू नका; केंद्राचा इशारा
अनेकांना नोकरीचे आमिष दाखवून किंवा फसवणूक करून रशियन सैन्यात भरती केले गेल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने पुन्हा एकदा हिंदुस्थानींना इशारा दिला आहे की, अशा प्रकारे रशिया-युक्रेन संघर्षाचा भाग होऊ नका आणि कोणत्याही आमिषाला बळी पडू नका.
युक्रेनने नाटो (NATO) मध्ये सामील होण्याचा प्रयत्न केल्यामुळे फेब्रुवारी २०२२ मध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण केले होते. तेव्हापासून सुरू असलेल्या या युद्धात अनेक हिंदुस्थानींचा बळी गेला आहे. सुटका झालेल्या हिंदुस्थानींना मायदेशी परतण्यासाठी आवश्यक प्रवासाची कागदपत्रे आणि विमान तिकिटे उपलब्ध करून देण्यात परराष्ट्र मंत्रालय मदत करत असल्याचेही मंत्र्यांनी स्पष्ट केले.
























































