
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे येथे पत्रकार परिषद घेतली. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांचा गट एकत्र लढणार का? यासंदर्भात सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारण्यात आले. आमचा पहिल्या दिवसापासून प्रयत्न आहे की महाविकास आघाडी आणि कोणतेही समविचारी पक्ष पुण्याच्या विकासासाठी एकत्र येत असतील त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न आहे. पण अजून चर्चा तर होऊ द्या, त्यानंतर आम्ही सांगू, अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी मांडली.
आपली शहरं चांगली व्हावी, पुण्यात प्रदूषणाचा प्रश्न वाढला आहे, शुद्ध पाणी येत नाही, रस्ते आणि रहदारीचे प्रश्न वाढत आहेत हे लक्षात घेता पुणे शहराची परिस्थिती चांगली व्हावी म्हणून पुढे येणाऱ्यांसोबत चर्चा करू निर्णय घेऊ, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. अजून अधिकृत काही झालेले नाही, चर्चा झाली पाहिजे, चर्चा करूनच निर्णय झाले पाहिजे. त्यालाच लोकशाही म्हणतात. पुण्याच्या हितासाठी चर्चा करून, कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं.

























































