
2025 हे वर्ष ओटीटी प्रेमींसाठी मनोरंजनाचा खजिना ठरलंय. अवघ्या काही वर्षांमध्येच ओटीटी या प्लॅटफाॅर्मने चांगलंच बाळसं धरलंय. ओटीटी म्हणजे केवळ मनोरंजन नसून, दर्जेदार कलाकृतींचा आस्वाद घेण्याचं माहेरघर बनलं आहे. यंदा एकापेक्षा एक सरस कलाकृतींनी आपल्या मोबाईल आणि टीव्ही स्क्रीनवर धुमाकूळ घातला. कधी अंगावर काटा आणणारा सस्पेन्स, तर कधी डोळ्यात पाणी आणणारा कौटुंबिक ड्रामा ओटीटी सिरीजमधून पाहायला मिळाला. केवळ करमणूक न करता, कथेतील विविधता जपण्याकडे यंदा निर्मात्यांचा कल दिसून आला. सोशल मीडियावर तर या सिरीजच्या डायलॉग्सनी धुमाकूळ घातलाय. चला तर मग पाहूया, IMDB रेटिंगनुसार यंदाच्या अशा कोणत्या टॉप-5 वेब सिरीज ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं…
द बॅड्स ऑफ बॉलीवूड: The bads Of bollywood या सिरीजमधून दस्तुरखुद्द किंग खानचा चिरंजीव आर्यन खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ग्लॅमरस इंडस्ट्रीतील राजकारण आणि संघर्षावर आधारित या सीरिजने लोकप्रियतेत स्थान मिळवले. आर्यनने लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या या सिरीजला सर्वश्रेष्ठ नवोदित निर्देशक या पुरस्काराने सन्मानित केले आहे.

ब्लॅक वॉरंट: प्रसिद्ध ‘तिहार जेल’मधील सत्य घटनांवर आधारित ही सीरिज आहे. या सिरीजने आपल्या वास्तववादी मांडणीमुळे प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. विक्रमादित्य मोटवाने यांचं क्रिएशन असलेली ‘ब्लॅक वॉरंट’ या सिरीजमध्ये बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते शशी कपूर यांचा नातू झहान कपूरने ओटीटी विश्वात पदार्पण केलं. ही वेबसीरिज 10 जानेवारीपासून नेटफ्लिक्सवर पहायला मिळाली.

पाताल लोक सीझन 2: पहिल्या सीझनच्या प्रचंड यशानंतर, हाथीराम चौधरीच्या भूमिकेतील जयदीप अहलावतने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. ही सिरीज Amazon Prime Video वर प्रदर्शित झाली. जयदीप अहलावत आणि इश्वाक सिंग यांनी मुख्य भूमिका केल्या आहेत. हा सीझन दिल्लीतील एका गूढ हत्येच्या तपासावर आधारित आहे.

पंचायत सीझन 4: फुलेरा गावची साधी कथा, विनोद आणि भावनिक जोड यामुळे ही सीरिज यावर्षीही सर्वाधिक रेटिंग मिळवणाऱ्या सीरिजपैकी एक ठरली.या सिरीजच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली होती. तीन सीझन हिट ठरल्यानंतर चौथ्या सीझनेही मुसंडी मारली. यामुळे आता चाहत्यांना पाचव्या सीझनची अपेक्षा आहे.

द फॅमिली मॅन 3– क्राईम (Crime Series) , सस्पेंस, थ्रिल , ट्विस्ट्स आणि फॅमिली इमोशन्स हे कसं एकाच सीरिजमध्ये अगदी कुशलतेनं मांडता येऊ शकतं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही सिरीज आहे. नवे मिशन्स, व्हिलन्स आणि कौटुंबिक चढउतार यांनी प्रेक्षकांना ही सिरीज पाहण्यासाठी प्रोत्साहित केलं. मनोज बाजपेयी यांची ही सुपरहिट सिरीज पुन्हा एकदा प्रेक्षकांची पहिली पसंती ठरली.

मंडला मर्डर्स: ही वेब सिरीज एक रहस्यमयी क्राईम थ्रिलर असून, त्यातील पटकथा आणि सस्पेन्समुळे तिने टॉप-5 मध्ये जागा मिळवली.



























































