मतचोरी EVM द्वारे नाही तर, मतदार याद्यांद्वारे होत आहे, अभिषेक बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगावर आरोप

मतचोरी ईव्हीएमद्वारेनाही तर, मतदार याद्यांद्वारे होत आहे, असा आरोप तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी केला आहे. दिल्लीत आज निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अभिषेक बॅनर्जी यांनी हा आरोप केला आहे.

अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, “पूर्वी सरकार कोणाचे बनवायचे, हे मतदार ठरवत होते… पण आता मतदार कोण असतील हे सरकार ठरवते. हा नवा हिंदुस्थान आहे. ज्ञानेश कुमार यांना या संघटनेचा आणि आपल्या देशाचा नाश करण्याच्या मोहिमेवर पाठवण्यात आले होते. मी ज्ञानेश कुमार यांना आव्हान देतो की, त्यांनी आमच्या अडीच तासांच्या बैठकीचे सीसीटीव्ही फुटेज प्रसिद्ध करावे. ते एकटेच बोलत होते.”

अभिषेक बॅनर्जी यांनी भाजपेतर पक्षांना आवाहन करत म्हटलं आहे की, “मी समान विचारसरणीच्या पक्षांना आवाहन करतो की, त्यांनी मतदार यादीत सॉफ्टवेअरद्वारे होणारी चोरी पकडावी. जर असे होत नसेल तर लॉजिकल डिस्क्रिपन्सी यादी जारी करावी. यापूर्वी एसआयआरमध्ये संशयास्पद यादी अशी कोणतीही गोष्ट नव्हती. मी ज्ञानेश कुमार यांना स्पष्टपणे सांगितले की, तुम्ही निवडणूक यादीचा हत्यार म्हणून वापर करत आहात.”