विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करा, हर्षवर्धन सपकाळ यांची आयोगाकडे मागणी

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षांच्या उमेदवारांना अर्ज दाखल करताना धमकावल्याचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. नार्वेकर यांचे वर्तन आक्षेपार्ह व आदर्श आचारसंहितेचा भंग करणारे असल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत तसेच त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱयांवरही गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य निवडणूक आयुक्तांकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.

प्रभाग क्रमांक 225, 226 व 227 मधून राहुल नार्वेकर यांचे भाऊ मकरंद नार्वेकर, बहीण गौरवी शिवलकर व वहिनी हर्षदा नार्वेकर या तिघांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज दाखल करताना राहुल नार्वेकर हे स्वतः उपस्थित होते. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना नार्वेकर यांनी पोलिसांच्या माध्यमातून भाजप उमेदवारांच्या विरोधात अर्ज दाखल करणाऱया विरोधी पक्षांच्या उमेदवारांना धमकावले तसेच अर्ज भरण्यापासून रोखण्यात आले. अशा प्रकारे एका महत्त्वाच्या व संवैधानिक पदावरील व्यक्तीने लोकशाहीचे धिंडवडे काढून निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणला. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे, असे सपकाळ म्हणाले.

नार्वेकरांच्या कार्यालयातील 70 कर्मचारी प्रचारात

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यालयातील तब्बल 70 अधिकारी व कर्मचारी नार्वेकर यांचे नातेवाईक असलेल्या उमेदवारांच्या निवडणूक प्रचारात सक्रिय भाग घेत आहेत. या सर्वांवरही आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.