
नागपूरमधील महाराष्ट्र सरकारच्या एका शैक्षणिक संस्थेतील ज्येष्ठ प्राध्यापक महिलेची निवडणूक कर्तव्यावर नेमणूक झाल्याने प्रशासनाच्या असंवेदनशीलतेचा गंभीर प्रकार समोर आला आहे. 56 वर्षीय या प्राध्यापक महिलेवर कर्करोगावरील उपचार सुरू असून 15 जानेवारी रोजी त्यांची केमोथेरपीची ठरलेली तारीख असतानाही त्याच दिवशी निवडणूक कर्तव्य बजावण्याची जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.
या प्रकरणी संबंधित महाविद्यालयाने 26 डिसेंबर रोजीच आरोग्य कारणे नमूद करत नागपूर महानगरपालिका यांना पत्र पाठवून निवडणूक कर्तव्यातून सूट देण्याची मागणी केली होती. मात्र, असे असतानाही 7 जानेवारी रोजी या प्राध्यापक महिलेला पुन्हा निवडणूक प्रशिक्षण कार्यशाळेसाठी उपस्थित राहण्याचा फोन आला.
दरम्यान, निवडणूक कर्तव्याला नकार दिल्याप्रकरणी चार प्राध्यापकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर संबंधित महिला अधिकच भयभीत झाली. नोकरी धोक्यात येऊ नये किंवा निवृत्तीवेतनावर परिणाम होऊ नये, यासाठी ती वारंवार महानगरपालिकेच्या कार्यालयात फेऱ्या मारत आहे. अमरावतीतही प्रशिक्षणाला गैरहजर राहिल्याने किमान 514 सरकारी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
आपल्या वैद्यकीय कागदपत्रांसह त्यांनी आपली केमोथेरपीची पुढील तारीख 15 जानेवारी असल्याचे स्पष्ट केले आहे. निवडणूक कर्तव्य पाहणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अर्जावर ‘विचार करावा’ अशी नोंद केली असली, तरी अधिकाऱ्यांनी अद्याप त्यांचे नाव यादीतून वगळलेले नाही, असा त्यांचा आरोप आहे.
गुरुवारी पुन्हा महानगरपालिकेच्या मुख्यालयात गेल्यावर अधिकाऱ्यांनी त्यांना ‘रिझर्व्ह पूल’मध्ये ठेवण्यात येईल, असे सांगितले. मात्र, रिझर्व्ह पूलमधील कर्मचाऱ्यांनाही ठरावीक ठिकाणी हजर राहावे लागते आणि गरज पडल्यास मतदान केंद्रांवर पाठवले जाते. केमोथेरपीच्या दिवशी हे शक्य नसतानाही नाव यादीत कायम असल्याने गुन्हा दाखल होण्याची किंवा कारणे दाखवा नोटिसची भीती कायम आहे.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे विधानपरिषदेतील सदस्य अभिजीत वंजारी यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. कर्करोगासारख्या गंभीर आजारावर उपचार घेणाऱ्या रुग्णांना कोणत्याही परिस्थितीत निवडणूक कर्तव्यात जुंपू नये, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली असून या प्रकरणात ते संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.





























































