
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत अमराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपने उत्तर प्रदेश, बिहार यासह देशातील अन्य राज्यांतील नेत्यांना प्रचारात उतरवले आहे. तामीळनाडूतील भाजपचे नेते के अण्णामलाई यांनी मुंबईतील वॉर्ड क्रमांक 47 येथे प्रचार केला. या वेळी त्यांनी ‘बॉम्बे इज नॉट महाराष्ट्र सिटी’ असे वादग्रस्त विधान करत मुंबईबरोबर राज्यातील जनतेच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला.
महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईत आलेले भाजप नेते अण्णामलाई यांनी एका मुलाखतीत मुंबईचा उल्लेख बॉम्बे असा केला. एवढय़ावरच ते थांबले नाहीत, तर त्यांनी बॉम्बे महाराष्ट्रातले शहर नाही तर ते आंतरराष्ट्रीय शहर आहे, असा उल्लेख केला. इथल्या लोकांना ट्रिपल इंजिन सरकार हवे. जर तुम्ही चेन्नई पाहिले तिथे डिएमके आहे आणि टॉपला भाजप, बंगळुरू काँग्रेस, भाजप आणि हैदराबाद येथेही काँग्रेस, भाजप असे आहे. मात्र देशातील एकमेव असे शहर आहे, जिथे ट्रिपल इंजिन सरकार शक्य आहे. केंद्रात मोदी, राज्यात देवेंद्र आणि बीएमसीमध्ये भाजपचा महापौर असेल, असा दावा अण्णामलाई यांनी केला.
शेवटी पोटातले ओठावर आले – शिवसेना
शेवटी पोटातले ओठांवर आलेच. भाजपला आम्ही शेवटचे सांगतोय, निवडणुका गेल्या तेल लावत, पण मुद्दामहून असल्या बांडगुळांना आणून मराठी माणसाला चिथावू नका. पुन्हा तुमचा कुणी भाजपवाला मुंबादेवीच्या मुंबईला बॉम्बे म्हणाला आणि बलिदान देऊन मिळवलेल्या मुंबईवरून मराठी माणसालाच हिणवले तर तुमची मराठी माणसाशी गाठ आहे, अशा शब्दांत शिवसेना राज्य संघटक अखिल चित्रे यांनी भाजप नेत्यांना सुनावले. शहरांची नावे फक्त शब्द नसतात, तर भाषा, संघर्ष, अभिमान आणि स्वाभिमान दर्शवतात. मुंबई म्हणजे मुंबईच! बॉम्बे नाही आणि मुंबई महाराष्ट्राचीच असे चित्रे यांनी बजावले.




























































