
>> दिव्या सौदागर
आत्मविश्वास कमी होण्यात, स्वतच्या क्षमतांबाबतच्या भीतीचे मूळ हे अनेकदा ‘एकटेपण आणि असुरक्षितता’ यातून येते. ही असुरक्षितता ज्या कारणांनी येते ती कारणं समुपदेशानातून दूर सारणे तितकेसे अवघड नाही.
असं म्हटलं जातं की आई आणि तिच्या मुलाचं नातं हे निखळ असतं. आईचं प्रेम हे निर्व्याज असतं. आई आपल्या मुलासाठी वाटेल तो त्याग करायला तयार असते. तिच्यासाठी तिचं मूल हेच प्राधान्य असतं, पण क्षितिजच्या (नाव बदलले आहे) बाबतीत ही सगळी वाक्यं अशक्य होती. ‘आई’ हा शब्द उच्चारतानाही त्याच्या बोलण्यातून आपुलकी किंवा माया येत नव्हती. एक प्रकारचं तुटलेपण, अपेक्षाभंग, सगळ्याच बाबतीतली निराशा अशा स्वतच्या समस्यांशी तो वर्षानुवर्षे झगडत होता. क्षितिजला म्हणूनच त्याचे वडील जवळचे वाटायचे. कारण त्याच्याशी गप्पा मारायला, त्याचं ऐकून घ्यायला ते कायम असायचे. दोघंही भरपूर गप्पा मारत. क्षितिजसोबत ते स्वतही चौथीतील मूल बनून जात. दोघंही बापलेक एकत्र मिळून पिकनिकला, सिनेमाला जात असत. दोघांचं एक वेगळंच विश्व होतं. असं असूनही क्षितिजला यावेळी समुपदेशनाला आणावं लागलं होतं.
त्याचं कारण असं होतं की, क्षितिज आता अधिकाधिक अलिप्त व्हायला लागला होता. आता नववीच्या वर्गात होता तो. अत्यंत हुशार असूनही परीक्षेत त्याला सतत अपयश येत होतं. बाबांशीसुद्धा तो हल्ली बोलेनासा झाला होता. कुठल्याही मागण्या त्यांच्याकडे करत नव्हता. त्याच्या आईलाही हा फरक जाणवला तसं तिने त्याला एकदा छेडलं होतं. तेव्हा ‘बाबा बदलले आहेत.’ एवढं मोजकंच बोलला.
‘माझ्यावर का त्याचा राग हे अजूनही मला समजत नाहीये.’ सत्राला आल्यानंतर आणि स्वतबद्दल मुलाने काढलेल्या उद्गारांमुळे व्यथित झालेल्या क्षितिजच्या वडिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘माझं अजूनही त्याच्यावर तेवढंच प्रेम आहे.’ हे त्यांना बहुधा त्याला सांगायचं होतं, पण त्याच्या मनात कुठल्या तरी प्रकारची एक अढी घर करून बसली होती आणि तिला काढून टाकण्यासाठीच त्यांनी समुपदेशनाला क्षितिजला घेऊन येण्याचं निश्चित केलं.
‘तुझे बाबा बदलले आहेत असं तुला का वाटतं?’ हा प्रश्न विचारता क्षणीच क्षितिजचं उत्तर तयार होतं. ‘मला कळतं सगळं. बाबा आईला भरपूर फेवर करत असतात. माझ्याबद्दल आई जे काही सांगते ते सगळं ऐकून घेतात आणि मला ओरडतात. त्यामुळं मी हल्ली त्यांच्याबरोबर वेळ घालवणंही कमी केलंय.’ त्याच्या या उत्तराची शहानिशा जेव्हा त्याच्या वडिलांजवळ केली तेव्हा ते लागलीच म्हणाले; ‘खरं म्हणतोय तो. मी माझ्या बायकोचं ऐकून घेतो याचं कारण ती खरं बोलते असं नाहीये. फक्त मला क्षितिजवर त्याचा परिणाम होऊ द्यायचा नसतो. तिचं विश्व हे फक्त तिच्याभोवती फिरत राहिलेलं आहे. स्वतच्या अहंकारापुढे ती कोणापुढेही वाकत नाही. क्षितिजच्या जन्मानंतर ती बदलेल असं वाटलं, पण माझी बायको काही बदलली नाही. त्याच्या जन्मानंतर लगेच सहा महिन्यांत तिने ऑफिस जॉइन केलं आणि ऑफिस टूरसाठी बाहेरही गेली. मग मलाच त्याची जबाबदारी उचलावी लागली. मी तुम्हा दोघांना सोडून जाईन, अशा धमक्या मला कायम द्यायची. म्हणून मी शेवटी तिचं ऐकायला सुरुवात केली.’ हे सगळं क्षितिज ऐकत होताच.
खरं होतं हे! कारण क्षितिज जेव्हा पहिल्यांदा सत्रामध्ये आला तेव्हा त्याने स्वत त्याचा सल सांगितला होता. अत्यंत हळवा आणि आई बाबा हेच विश्व असलेल्या त्याचा आईवर प्रचंड जीव होता. तिच्या व्यक्तिमत्त्वाने तो भारावला जायचा. पण स्वतच्या गरजपूर्तीसाठी आई त्याचा प्यादं म्हणून करायला लागली होती. त्यामुळे तो तिला वचकून राहायला लागला. त्याचे वडीलही हेच करत आलेले होते. त्यांचेही आईवडील म्हणजेच क्षितिजचे आजी-आजोबा त्यांच्या लहानपणीच वारले होते. त्यामुळे त्याच्या वडिलांनी एकटेपण अनुभवलं होतं. त्यामुळे त्यांच्या बायकोला ते प्रमाणापेक्षा जास्त जपत होते. हे क्षितिज बघत आलाच होता. त्यामुळे त्या दोघांच्या मनात असलेली एकटेपणाची भीती काढणं हे आव्हान होतं.
त्या दोघांचीही वैयक्तिक सत्रे चालू केली गेली ज्यामध्ये त्यांच्या मनात खोल रुतून बसलेल्या भीतीचे मूळ शोधले गेले. जसे त्याच्या वडिलांचे भीतीचे मूळ हे ‘एकटेपण आणि सामाजिक गरज’ यात होते तर क्षितिजाच्या भीतीचे मूळ हे ‘एकटेपण आणि असुरक्षितता’ असे होते. म्हणूनच क्षितिजसाठी सत्रात त्याच्या आत्मविश्वास वाढीवर जोर दिला गेला. तो स्वत त्याचा अभ्यास करण्यासाठी सक्षम राहू शकतो हे त्याला पटवून दिले गेले. त्यासाठी त्याला अभ्यास कौशल्ये, वेळेचे नियोजन, ताणाचे व्यवस्थापन सांगितले गेले.
त्याच्या वडिलांसाठी आखल्या गेलेल्या वैयक्तिक सत्रांत त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या नातेसंबंध जाण्यावर भर दिला गेला. तेव्हा समजलं की त्यांचं लग्न म्हणजे दोन्ही बाजूंनी अॅडजस्टमेंट होती. दोघांच्या स्वभावात जमीन अस्मानाचा फरक होता. ते स्वत अनाथ. त्यामुळे त्यांना तिच्याशिवाय कोणीही नव्हते, तर त्यांची पत्नी ही अतिशय अहंकारी असल्याने तिला तिच्या माहेरचेही दुरावले होते. परंतु आता क्षितिजही तसाच होतोय हे लक्षात आल्यावर त्यांनी बदलण्याचं निश्चित केलं.
या सगळ्यांचा परिणाम म्हणजे क्षितिज आणि त्यांचे बंध अधिकाधिक मजबूत व्हायला लागले. ‘आम्ही दोघं एकमेकांसाठी आहोत. आम्ही एकटे नाहीत’, ही भावना दोघांमध्येही वाढीला लागली. क्षितिज तर आता स्वतंत्र अभ्यास करत होताच आणि त्यात त्याला मजाही येत होती. त्याच्या वडिलांनीही स्वतला त्यांच्या मित्रपरिवारामध्ये, स्वतच्या छंदांमध्ये गुंतवून घेतलं. यात एक गोष्ट आहे तशीच राहिली. ती म्हणजे क्षितिजची आई आणि तिचा अहंकार. बापलेक मात्र स्वतच्या मानसिक शांतीसाठी प्रयत्न करत होते.
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)






























































