
>> डॉ. मंजिरी भालेराव
2000 पेक्षा जास्त वर्षे वापरात असलेला नाणेघाट हा व्यापारी मार्ग शिलालेख, प्राचीन अभिलेखीय पुरावे, शैलगृहांची रचना यातून समृद्ध विश्वाचा दाखला देतात. हा व्यापारी मार्ग इतिहासातील अनेक महत्त्वाच्या घटनांचा तसेच तत्कालीन समृद्धीचा साक्षीदार आहे.
नाणेघाट या नावाने आज प्रसिद्ध असलेला हा व्यापारी मार्ग काही वाहनांनी पार करायचा मार्ग नव्हता तर बैल, घोडे, खेचर, गाढव तसेच पायी पायी चढायचा रस्ता होता. त्यामुळे जरी खूप मोठय़ा प्रमाणावर राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार इथून होत असला तरी त्याला मर्यादा होत्या. बैलगाडी, घोडागाडी अशा प्रकारची वाहने इथून येऊ शकत नव्हती. असे असूनही कमी वेळात पार होणारा मार्ग म्हणून याचा पूर्वी वापर झाला आणि आजही मोठय़ा प्रमाणात वापर होतो. 1675 साली डॉ. फ्रायर या ब्रिटिश प्रवाशाने येथून प्रवास केला होता. त्याला घाट उतरून खाली जायचे होते, पण तेव्हा 300 हून जास्त बैल मीठ घेऊन घाट चढत होते, त्यामुळे सगळा ‘ट्राफिक जाम’ झाला होता. बराच वेळ उन्हात थांबून त्याने शेवटी खालच्या व्यापाऱयांना वर येण्यापासून थांबवले आणि मग त्याने घाट पूर्ण केला असे त्याच्या प्रवासवर्णनात नोंदवून ठेवले आहे. रस्त्यामध्ये विविध टप्प्यांवर भरपूर पाणी असलेली टाकी आणि नंतर छान झाडी होती असेही त्याने नोंदवले आहे.
हा घाट कोणी तयार केला हे सांगणारे कोणतेही पुरावे आज शिल्लक नाहीत. काही अभ्यासकांच्या मते, अगदी पूर्वीपासून असलेली एक खिंड कदाचित सातवाहनांच्या काळात मोठी करून पुढे दगडांची नागमोडी रचना करून हा मार्ग त्यांनी तयार करून घेतला असावा. त्यामुळे घाट चढून वर आल्यावर जो जकातीचा रांजण आहे त्यात जकात दिल्याशिवाय व्यापाऱयांना पुढे जाता येणार नव्हते. घाटाचा शेवट जवळ आल्यावर विश्रांतीसाठी व पाणी पिण्यासाठी एक शैलगृह तयार केले होते. त्यामध्ये बसायला भिंतीलगत बाक कोरले होते, तर बाहेर पाण्याची अनेक टाकी होती. हे सर्व आजही पाहायला मिळते.
नाणेघाटातील या शैलगृहात डाव्या व उजव्या भिंतीवर असलेला शिलालेख ब्राह्मी लिपी आणि प्राकृत भाषेत कोरलेला आहे. त्याकाळी सामान्यपणे व्यवहारासाठी प्राकृत या भाषेचा वापर लोक करत असत. ब्राह्मी लिपीत असलेल्या या शिलालेखाच्या अक्षरवटिकेवरून या शिलालेखाचा काळ साधारणत इ.स.पूर्व दुसरे-पहिले शतक असावा. या लेखाच्या प्रारंभी प्रजापती, धर्म, इंद्र, संकर्षण, वासुदेव, चंद्र, सूर्य, कुमार आणि चार दिक्पाल- यम, वरुण, कुबेर, इंद्र यांना अभिवादन केले आहे. या शिलालेखात नागनिकेने सातकर्णी राजाबरोबर केलेल्या अनेक श्रौत यज्ञांचे ज्यामध्ये दोन अश्वमेध व एक राजसूय तसेच अग्न्याधेय, अनारंभणीय, गवामयन, भगलदशरात्र, आप्तोर्याम, अंगिरसामयन, गर्गत्रिरात्र, अंगिरसात्रिरात्र, शतात्रिरात्र इत्यादींचे उल्लेख आहेत. या लेखातील काही भाग तुटलेला असल्याने त्यामधून वाजपेय या यज्ञाचा उल्लेख आज नाहीसा झाला आहे, पण ज्येष्ठ पुराभिलेखतज्ञ कै. डॉ. शोभना गोखले यांनी वाजपेय या यज्ञाच्या वेळी दिल्या जाणाऱया दानाच्या उल्लेखावरून (जे 17 या संख्येच्या पटीत असतात) या यादीत वाजपेय यज्ञाचाही उल्लेख होता हे सिद्ध केले.
विंध्य पर्वताच्या दक्षिणेला असलेल्या प्रदेशामधील यज्ञसंस्थेचे आणि यज्ञ करण्याचे हे सर्वात प्राचीन अभिलेखीय पुरावे आहेत. या यज्ञांच्या उल्लेखावरून तत्कालीन समाजातील यज्ञसंस्थेचे महत्त्व दिसून येते. या सर्व यज्ञांच्या नामनिर्देशाबरोबरच लेखात ब्राह्मणांना आणि यज्ञ करताना काम केलेल्या सेवकांना दिलेल्या हजारो गाई, हत्ती, घोडे, रथ, नाणी, सोन्या-चांदीचे अलंकार इत्यादींचे उल्लेख आहेत. या शिलालेखात आकडय़ांचा आणि नाण्यांचा विपुल प्रमाणात उल्लेख केला आहे. ‘काहापन’ (कार्षापण) आणि ‘पसपक’ (प्रसर्पक) या नाण्यांचे उल्लेख या लेखात आहेत. या मार्गावरून ये-जा करणाऱया जनतेला सातवाहन सम्राट आणि सम्राज्ञीने केलेल्या धार्मिक कार्याची व सातवाहनांच्या समृद्धीची ओळख व्हावी, असा हा शिलालेख कोरण्याचा उद्देश असावा. त्याचबरोबर मुळात हे यज्ञ केल्याने राजाचे सार्वभौमत्व प्रस्थापित करणे तसेच ते लोकांच्या मनावर ठसवणे हे उद्देशही याने साध्य होतात. राजाच्या सार्वभौमत्वाला देवतांची मान्यता आहे तसेच प्रजेच्या भौतिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी, इहलोक व परलोकातील कल्याणासाठी हे यज्ञ केले आहेत हे या लेखातून अधोरेखित केलेले असावे.
हे यज्ञ जेव्हा झाले तेव्हा राजा सातकर्णी जिवंत असणार यात काही शंका नाही, पण दुर्दैवाने त्याचा लवकरच अंत झाला असावा आणि त्याच्या पत्नीने म्हणजे देवी नागनिकेने राज्याची धुरा सांभाळली असणार. याच देवी नागनिकेने भारतीय इतिहासात प्रथमच स्वतच्या आणि तिच्या पतीच्या नावाने नाणी पाडली होती. ती नाणी जुन्नर परिसरात सापडतात.
तिच्यानंतर क्वचितच अशी राणीने नाणी पाडल्याची उदाहरणे आहेत.
या व्यापारी मार्गावरून प्रवास करणारे व्यापारी हे केवळ भारतीयच नव्हते तर परदेशी पण होते यात शंका नाही. या मालिकेतील सुरुवातीच्या लेखांमध्ये व्यापारी मार्ग, बौद्ध धर्म आणि त्यांच्यासाठी कोरलेली लेणी यांचा संबंध आपण पाहिला आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात होत असलेल्या व्यापाराचे फलित म्हणून जुन्नरमध्ये भारतातील सर्वात मोठे लयनसंकुल अस्तित्त्वात आलेले दिसते. जुन्नरच्या भोवती असलेल्या टेकडय़ांमध्ये 183 पेक्षा जास्त कोरीव शैलगृहे आहेत.
या घाटाचा वापर सातवाहनांबरोबर संपला नाही तर तो मध्ययुगातही मोठय़ा प्रमाणावर चालू होता. तो वापर इतक्या मोठय़ा प्रमाणात होता की, या मार्गाने येणाऱया व्यापारी आणि मालाच्या सुरक्षिततेसाठी तसेच कर किंवा जकातीसाठी याच्याजवळ अनेक किल्ले बांधले गेले. जीवधन, चावंड, हडसर, शिवनेरी, नारायणगड इ. त्यापैकी काही आहेत. आजही या मार्गाचा वापर मोठय़ा प्रमाणात केला जातो. या परिसरातील अनेक लहान वाडय़ावस्त्यामधील लोक या मार्गाने खाली असलेल्या गावातील बाजारात गुरांना घेऊन जाऊन त्यांची खरेदी-विक्री करत असतात. अशा प्रकारे कमीत कमी 2000 पेक्षा जास्त वर्षे वापरात असलेला हा नाणेघाट इतिहासातील अनेक महत्त्वाच्या घटनांचा तसेच तत्कालीन समृद्धीचा साक्षीदार आहे.
(लेखिका टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथे संस्कृत व भारतीय विद्या अध्ययन केंद्राच्या विभागप्रमुख आहेत.)































































