
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या 81 जागांसाठी होणार्या निवडणुकीची प्रचार रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात असून, सर्वच प्रभागात व वार्डात उमेदवारांनी पायी प्रचार रॅली तसेच भोंगे लावून आपापल्या पक्षाचा प्रचार सुरू केला आहे. शिवसेनेने देखील ३१ वार्डात आपले उमेदवार उभे केले असून, त्याठिकाणी दणदणीत प्रचार पक्षाने सुरू आहे.
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचा पहिला महापौर सुधाकर पांढरे यांच्या रुपाने शिवसेनेने बसवून महापालिकेत इतिहास निर्माण केला. पहिल्याच वर्षी जवळपास दिडशे कोटी रुपयांच्या योजनांची बरसात करुन पिरबुर्हाणनगर, देगलूर नाका व अन्य पाच ठिकाणी मोठ्या क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या बसूवन त्यावेळी शिवसेनेने दुर्गम भागातील कमी दाबाने पाणी येणार्या भागात पाणी पोहचवले.
महानगरपालिकेच्या ८१ जागांसाठी १५ जानेवारी रोजी निवडणूक होणार असून, या निवडणुकीत शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने ३१ जागी आपले उमेदवार मोठ्या ताकदीने उभे केले आहेत. शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी त्यांना विजयी करण्यासाठी कंबर कसली आहे. वार्डावार्डात जावून घरोघरी शिवसैनिक प्रचार रॅली काढून आपला प्रचार करीत आहेत. भारतीय जनता पक्षातर्फे ६६, शिंदे गटाकडून ६२, काँग्रेस पक्षातर्फे ५४, अजित पवार गटाकडून ५२, एमआयएमच्या वतीने ३४, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने १६, बसपा ११, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून ५, शहर विकास आघाडी ४, मराठवाडा जनहित पार्टी ४, मनसे ४, समाजवादी पार्टी ४, संभाजी ब्रिगेड ३, आम आदमी पार्टी २, भाकपा २, रिपाइं खो-२, अपक्ष व इतर १३५ असे एकूण ४९१ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती झाली आहे.
नांदेड उत्तर आणि दक्षिण या दोन्ही मतदारसंघात शिंदे गटाचे आमदार असताना या गटात पडलेली फुट हा सर्वात महत्वाचा विषय चर्चिला जात आहे. आमदार बालाजी कल्याणकर यांनी नांदेड उत्तरमध्ये ४० उमेदवार स्वतंत्रपणे उभे केले आहेत. तर नांदेड दक्षिणमध्ये संपर्कप्रमुख आमदार हेमंत पाटील व आमदार बोंढारकर यांनी राष्ट्रवादीशी युती केली आहे. पक्षाने तिकीट नाकारलेल्या बंडखोर उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार हेमंत पाटील, आमदार बाबुराव कदम यांनी संपर्क नेते सिध्दराम मेहत्रे यांच्या उपस्थितीत सभा घेतल्याने कल्याणकर समर्थकांनी हस्तक्षेप करुन घोषणाबाजी केल्याने प्रचंड राडा झाला होता. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षातर्फे काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेल्या माजी महापौर बलवंतसिंघ गाडीवाले, शिला किशोर भवरे, उपमहापौर सतीश देशमुख तर एमआयएमकडून उपमहापौर अब्दुल शमीम तर आनंद शंकरराव चव्हाण हे माजी उपमहापौर काँग्रेसकडून रिंगणात उतरले आहेत.
पंचरंगी लढतीत नांदेडकर प्रचाराच्या रणधुमाळीत १५ जानेवारी रोजी कुणाच्या बाजूने कल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून असून, १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.




























































