एकावेळी एकाच वॉर्डच्या मतमोजणीमुळे निवडणुकीचे निकाल रखडणार

पालिका निवडणुकीची मतमोजणी आता एकावेळी एकाच वॉर्डची होणार असल्यामुळे निवडणुकीचे निकाल रखडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रक्रियेत दुपारपर्यंत स्पष्ट होणारे निकालाचे चित्र जाहीर होण्यास मध्यरात्र होण्याचा अंदाज आहे. याबाबत पालिकाही संभ्रमात असून नक्की कुठल्या पद्धतीने मतमोजणी करायची याच्या मार्गदर्शक सूचना द्याव्यात यासाठी राज्य निवडणूक आयोगाला पत्रही देण्यात आले आहे.

मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होत असून दुसऱया दिवशी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे. या निवडणुकीत मुंबईतील 227 प्रभागांसाठी 23 विभाग निवडणूक कार्यालये तैनात करण्यात आली आहेत. या 23 विभाग निवडणूक कार्यालयांतर्गत आठ ते दहा प्रभागांच्या मतमोजणीची जबाबदारी असेल. मात्र ईव्हीएमची मतमोजणी होण्याआधी सुमारे 500 टपाल मतांच्या मोजणीसाठी अर्धा ते एक तास गृहित धरता आणि एका प्रभागातील सुमारे सात हजार मतांच्या मोजणीला लागणारा किमान दीड ते दोन तासांचा कालावधी पाहता एका मतदान केंद्रावरील निकाल जाहीर होण्यास दोन ते तीन तासांचा कालावधी लागणार असून शेवटच्या प्रभागाचा निकाल हाती येईपर्यंत मध्यरात्र होण्याची शक्यता आहे. एका वेळी एका प्रभागाच्या मतमोजणी नियोजनामुळे निकाल रखडणार असल्याचे शिवसेना उमेदवार सचिन पडवळ यांनी सांगितले. त्यामुळे पालिकेने याबाबत योग्य मार्ग काढावा. निकाल लवकरात लवकर लावण्यासाठी पूर्वीप्रमाणेच एकाच वेळी सर्व प्रभागांत मतमोजणी सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

गर्दीचे नियोजन कोलमडणार, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न

पालिका सध्याच्या नियोजनानुसार मतमोजणी अनुक्रमाने करणार असली तरी निकाल जाहीर होण्याच्या दिवशी सकाळीच सर्वच प्रभागांतील उमेदवारांचे प्रतिनिधी-कार्यकर्ते मतमोजणी केंद्रावर जमा होणार आहेत. यावेळी निकाल जाहीर झाल्यावर होणारा जल्लोष, मतमोजणीवर येणारे आक्षेप आणि नेहमीच होणारी वादावादी पाहता गर्दीचे नियोजन कोलमडून कायदा-सुव्यवस्था प्रश्न निर्माण होण्याचा धोका आहे.

निवडणूक कर्मचाऱ्यांचे हाल

पालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान, तर 16 जानेवारी रोजी मतमोजणीसाठी हजारो कर्मचारी इलेक्शन डय़ुटीवर राहणार आहेत. हे कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून प्रशिक्षणासाठी हजर राहत आहेत. यातच अखेरच्या दोन दिवशी निकाल रखडल्यास या कर्मचाऱयांचेही हाल होणार आहेत.

पालिका म्हणते…

निवडणुकीच्या मतमोजणीसाठी 23 विभाग कार्यालयांमध्ये सुमारे 28 टेबल लावण्यात येतील. या ठिकाणी एका प्रभागाची मोजणी सुरू झाली तरी सर्व टेबलवर ही मोजणी झाल्याने अर्ध्या ते एका तासात निकाल लागेल.