
मोदींविरोधात फेसबुकवर रोखठोक भूमिका मांडल्याप्रकरणी लंडनमध्ये राहणारे डॉ. संग्राम पाटील यांच्यावर मुंबईत कारवाई करण्यात आली. डॉ. पाटील हे लंडनहून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर येताच त्यांना मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने उचलले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांची तब्बल 14 तास चौकशी करण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते. त्यानंतर पाटील यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले.
डॉ. संग्राम पाटील तसेच शहर विकास आघाडी नावाच्या फेसबुक खात्यावरून भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांविरोधात आक्षेपार्ह भूमिका मांडल्याची तक्रार ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. त्या तक्रारीवरून पोलिसांनी डॉ. संग्राम पाटील व शहर विकास आघाडी या खातेधारकांविरोधात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, डॉ. संग्राम पाटील हे यूकेमध्ये राहत असून ते आज पहाटे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले असता त्यांना मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने उचलले. त्यांना कार्यालयात नेऊन गुह्याच्या अनुषंगाने 14 तास चौकशी करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते. मात्र पाटील यांना 9 वाजता कार्यालयात आणून दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास बीएनएसएसच्या कलम 35 (3) नुसार नोटीस देऊन सोडून दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येते.
डॉ. संग्राम पाटील यांच्या विरोधात दाखल गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा नाही. त्या गुह्यात सात वर्षांपेक्षा कमी कालावधीची शिक्षा आहे. त्यामुळे अशा गुह्यात अटक न करता नोटीस देऊन सोडून देण्याचे प्रावधान बीएनएसएसमध्ये आहे. त्यानुसार डॉ. पाटील यांना नोटीस बजावून सोडून दिल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येते. डॉ. पाटील यांच्यावर अशाप्रकारे कारवाई करण्यात आल्याने सरकारविरोधात समाजमाध्यमांवर टीका होत आहे. सत्तेचे सत्य मांडणाऱया एका व्यक्तीला पोलिसांनी जो त्रास दिला व छळ केला त्याचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. तसेच हिंदुस्थानातून जाताना पोलिसांना भेटून जावे असे बंधन त्यांच्यावर घालण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते.



























































