
‘भाजपला शिवसेनाप्रमुखांनी जगवलं आहे. शिवसेनाप्रमुखांनी त्यांना दोन घास भरवले नसते तर राजकारणात त्यांचा कधीच मृत्यू झाला असता,’ अशी तोफ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज येथील विराट सभेत डागली. ‘भाजपकडे सत्तेची आणि पैशांची मस्ती आहे, पण माझ्याकडे निष्ठेची शक्ती आहे. पैशांची मस्ती अशीच चालणार असेल तर ममता बॅनर्जींप्रमाणे महाराष्ट्रही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही,’ असे त्यांनी ठणकावले.
छत्रपती संभाजीनगर येथील मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर झालेल्या विराट जाहीर सभेत ते बोलत होते. संभाजीनगरचा रखडलेला विकास, पाण्याचा प्रश्न, शेतकऱयांकडे होत असलेले सरकारचे दुर्लक्ष आणि सत्ताधाऱ्यांची बेताल वक्तव्ये अशा सर्वच मुद्दय़ांना हात घालत उद्धव ठाकरे यांनी भाजपसह सत्ताधारी नेत्यांची अक्षरशः सालटी काढली.
आमच्या ताटात सगळे पक्ष जेवून गेलेत असे वक्तव्य करणारे भाजपचे माजी खासदार रावसाहेब दानवे यांचा उद्धव ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला. ‘दानवे पडले तरी त्यांची मस्ती उतरली नाही. शिवसेनेनं कधी कोणाच्या ताटातले खाल्ले नाही. उलट भाजप आता लोकांच्या ताटातलं उष्टं, खरकटं खात आहे. स्वतःच्या ताकदीवर यांचे पोट भरत नसल्याने त्यांना सगळ्यांच्या पानातलं खावं लागतंय. इतकं खाऊनही यांची भूक भागत नाही,’ अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. छत्रपती संभाजी नगर येथे झालेल्या सभेत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
मेवाभाऊ आणि विनाशाची गती
संभाजीनगरच्या विकासाचे हार्ंडग्ज लावणाऱया फडणवीस यांचा उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. त्यांनी फडणवीसांना ‘मेवाभाऊ’ अशी उपमा दिली. ‘संभाजीनगरमध्ये 365 पैकी फक्त 44 दिवस पाणी येते. या शहरात माणसे राहतात की नाही? आणि असतील तर त्यांच्या मनात चीड, उद्वेग, राग आहे की नाही, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. ‘मी मुख्यमंत्री असताना पाण्यासाठी संभाजीनगर महापालिकेला पैसे मंजूर केले होते. सरकारच्या खात्यात ही योजना टाकली होती. मात्र ती कामं आता सुरूही झालेली नाहीत आणि हे मेवाभाऊ, विकासाचे हार्ंडग्ज लागतात. ही त्यांची विनाशाची गती आहे,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.
संभाजीनगरला नशामुक्त करण्याचे आश्वासन देणारे अजित पवार यांची उद्धव ठाकरे यांनी खिल्ली उडवली. ‘तुम्हालाच सत्तेची नशा चढली आहे. तुम्ही काय इतरांना नशामुक्त करणार? राज्यात सरकार असताना संभाजीनगरला नशामुक्त करू शकला नाहीत, आता महापालिका हाती घेऊन कसे करणार, असा सवाल त्यांनी केला. ‘संभाजीनगरमध्ये प्यायला पाणी मिळत नाही, पण दारूचे परवाने पटापट मिळतात, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
हेच का तुमचे हिंदुत्व?
हिंदुत्वाच्या मुद्दय़ावरून शिवसेनेवर टीका करणाऱया भाजपचा बुरखा उद्धव ठाकरे यांनी फाडला. ‘बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात तुषार आपटे आणि आणखी एक जण सहआरोपी होती. अक्षय शिंदेचे एन्काऊंटर केले आणि सहआरोपी असलेल्या तुषार आपटेला भाजपने स्वीकृत नगरसेवक केले. नगरसेवक निवडून आणायला मदत केली म्हणून एका विकृताला भाजपने स्वीकृत केले. पालघरमधील साधू हत्याकांडातील आरोपीला भाजपमध्ये प्रवेश दिला. हेच का तुमचे हिंदुत्व,’ असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
शल्य आहेच, पण आपलं नातं कायम आहे!
‘संभाजीनगरवर शिवसेनाप्रमुखांचं अलोट प्रेम होतं. अशा संभाजीनगरमध्ये लोकसभा व विधानसभेत शिवसेनेचा पराभव झाला हे शल्य आहे. हे मला लागलंय. मात्र आपलं एक नातं आहे. तुमचं प्रेम कायम आहे हे दिसत आहे. प्रेम नसतं तर काही नसताना हे मैदान भरलंच नसतं. या बळावरच आपण नवी सुरुवात केली आहे. ज्यांना दिलं, त्यांनी खाल्लं आणि माजले, गद्दार झाले. पण माझे काही बिघडलेले नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ‘जे केले आहे ते तुमच्यापुढे आहे, जे करणार आहे ते वचननाम्यात आहे. त्यामुळे संभाजीनगरवर भगवा झेंडा फडकलाच पाहिजे. विजयाच्या सभेत राजलाही सोबत घेऊन येईन,’ असे त्यांनी यावेळी सांगितले.
‘गुंठेवारी, एमआयडीसी, शाळा, रस्ते सुधारणा, कचरा हे विकासाचे मुद्दे अंबादास दानवे यांनी मांडले. विकासावर बोलण्याचे आव्हान देणाऱया मेवाभाऊंनी आता अंबादासना दोन हजार रुपये द्यावेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ‘माझ्या विकासाच्या भाषणावर बक्षीस लावण्यापेक्षा माझ्या शेतकऱयांचं देणं द्या, असेही उद्धव ठाकरे यांनी सुनावले.
केस चालू आणि फडणवीसही चालू
‘अजित पवारांवर फडणवीसांनी 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. ढीगभर, गाडीभर पुरावे घेऊन चालले होते. चौकशी लावली होती. आज त्यांनाच उपमुख्यमंत्री केलं? आता ते तुमचे पुरावे काय जाळायचे? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. ‘आता आरोपांबद्दल विचारले की केस चालू आहे असे सांगतात. केसचं जाऊ द्या, तुम्ही चालू आहात, असा टोला उद्धव ठाकरे यांनी हाणला.
‘राष्ट्र प्रथम’वाला भाजप मेला!
‘भाजपमध्ये निष्ठावंतांची अवस्था वाईट आहे. माखलेल्या लोकांना आंघोळ घालून स्वच्छ करण्याचे काम निष्ठावंतांना करावे लागत आहे. पक्ष फोडणे, चिन्ह चोरणे, श्रेय लाटणे एवढेच त्यांचे काम उरले आहे. राष्ट्र प्रथमवाला भाजप मेला आहे. भ्रष्टाचार, गुंड आणि बलात्कारी प्रथम हे त्यांचे घोषवाक्य झाले आहे,’ अशी सणसणीत टीका उद्धव ठाकरे यांनी केली.




























































