
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दिवशी 15 जानेवारी रोजी पालिका क्षेत्रासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मुंबई शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरासाठी स्वतंत्र दक्षता पथकांची स्थापना करण्यात आली आहे. याबाबत नागरिकांसाठी 9122-31533187 हा दूरध्वनी क्रमांकही प्रसिद्ध करण्यात आला आहे. 15 जानेवारी रोजी मुंबईतील सर्व उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणारी सर्व आस्थापने, कारखाने, दुकाने, खासगी कंपन्यांतील आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाटय़गृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना, तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स यांना सार्वजनिक सुट्टी लागू असेल. यामध्ये फक्त धोकादायक आणि अत्यावश्यक सेवांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल त्या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दोन ते तीन तासांची सवलत द्यावी, असे निर्देशही पालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.




























































