ईव्हीएम स्ट्राँगरूमच्या बाहेर सीसीटीव्ही आणि राजकीय कार्यकर्त्यांचा वॉच, मतदान यंत्रांना त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था; दिनेश वाघमारे यांची माहिती

>> राजेश चुरी

निवडणुकीतील मतदानानंतर ईव्हीएम ठेवल्या जाणाऱ्या स्ट्राँगरूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, रूमच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे, पोलिसांची तीनस्तरीय सुरक्षा व्यवस्था आणि राजकीय कार्यकर्त्यांना स्ट्राँगरूमच्या बाहेर लक्ष ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी निवडणुकीच्या तयारीवर दिली.

मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये 15 जानेवारी रोजी मतदान होत आहे. त्यानंतर दुसऱया दिवशी मतमोजणी होणार आहे. ईव्हीएमची संख्या, प्रत्यक्ष मतदान आणि मतमोजणीच्या तयारीची माहिती दिनेश वाघमारे यांनी दिली.

ईव्हीएमवर विरोधकांनी आक्षेप असल्याच्या प्रश्नावर सविस्तर भाष्य करताना दिनेश वाघमारे म्हणाले की, मतदान संपल्यानंतर उमेदवार किंवा मतदान प्रतिनिधीच्या उपस्थितीत मशिन सील होतात. नंतर त्याच्यावर सह्या घेतल्या जातात. त्याचे व्हिडीओ रेकार्ंडग होते. या मशिन्स पोलीस संरक्षणात वाहनाने स्ट्राँगरूमध्ये आणतात. त्यावर पोलिसांसह कार्यकर्त्यांचेही लक्ष असते.

ईव्हीएमची संख्या पुरेशी

मुंबईत 10 हजार 111 मतदान केंद्रे आहेत. 22 हजार 698 बॅलेट युनिट आणि 11 हजार 349 कंट्रोल युनिट आहेत. कंट्रोल युनिट हे निवडणूक अधिकाऱयाकडे असते आणि बॅलेट युनिट हे मतदान केंद्रात असते. ईव्हीएम खराब झाली तर त्वरित बदलण्याच्या सूचना दिल्या आहेत. कारण ईव्हीएम खराब झाल्यास मतदान थांबते आणि मग कायदा व सुव्यव्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते.

ईव्हीएम ‘स्टॅण्डअलोन मशिन’

मतदान यंत्र ब्लू टूथशी कनेक्ट किंवा वायफायशीही कनेक्ट होत नाही ते स्टॅण्डअलोन मशिन असते. कशाशीही कनेक्ट करता येत नाही. स्ट्राँगरूमच्या बाहेर ‘जॅमर’ बसवता का, असे प्रश्न विचारला जातो. पण त्याची गरज नसते. त्याची तरतूदही नसते.

दोन लाख कर्मचारी सज्ज

मतदानासाठी कर्मचारी वर्ग सज्ज आहे. 1 लाख 96 हजार कर्मचारी नियुक्त केले आहे. त्यांचे दोन प्रशिक्षण वर्ग झाले आहेत. प्रशिक्षणास गैरहजर होते त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. प्रशासकीय कारवाई व फौजदारी गुह्याचीही तरतूद आहे.

राज्यासाठी ईव्हीएम

राज्यातील 28 महानगरपालिकांमध्ये मतदानासाठी 39 हजार 147 मतदान केंद्रे आहेत. त्यासाठी 43 हजार 958 कंट्रोल युनिट आणि 87 हजार 916 बॅलेट युनिट उपलब्ध करून दिली आहेत.