
नव्या वर्षाच्या सुरुवातीला सोने-चांदीच्या दरात जबरदस्त तेजी दिसून आली. अमेरिकेने व्हेनेझुएलावर केलेल्या हल्ल्यानंतर सोने-चांदीचे दर वाढले होते. त्यानंतर गेल्या आठवड्यात दोन दिवस सोने- चांदीचे दर घसरले होते. मात्र, शुक्रवारी पुन्हा या धातूंच्या दरात तेजी दिसून आली. जागतिक घडामोडींमुळे या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात मोठी इलथापालथ झाली असून आठवड्याच्या शेवटच्या दिवशी दोन्ही धातू तेजीत दिसत होते.
आठवड्याभराच्या चढउतरानंतर शुक्रवारी बाजार बंद होताना चांदीच्या दरात 15,686 रुपयांनी तर सोन्याच्या दरात 3,114 रुपयांनी वाढ दिसून आली. बदलत्या जागतिक परिस्थितीमुळे या आठवड्यात दोन दिवस चांदीमध्ये मोठी घसरण झाली, तर शेवटच्या दिवशी तूफानी वाढ दिसून आली. आठवडाभरात सोने आणि चांदी दोन्हीच्या किंमतीमध्ये मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे चांदी आता २.५० लाखांच्या वर, तर सोने १.३७ लाखांच्या पुढे पोहचले आहे.
चांदीच्या किमतीत आठवड्याभरात मोठे चढ-उतार झाले आहेत. वर्षाच्या सुरुवातीला २ जानेवारी रोजी वायदे बाजारात ‘एमसीएक्स’वर चांदी २,३६,३१६ रुपये प्रति किलो होती. ती आठवड्याभरात २,५९,६९२ रुपयांच्या उच्चांकापर्यंत पोहोचली होती. शुक्रवारी बाजार बंद होताना ती २,५२,००२ रुपये प्रति किलोवर बंद झाली. आठवड्याचा विचार करता चांदी १५,६८६ रुपयांनी महागली आहे. चांदी सध्या तिच्या उच्चांकावरून (२,५९,६९२ रु.) सुमारे ७,६९० रुपयांनी स्वस्त मिळत आहे.
सोन्याच्या दरातही आठवडाभरात लक्षणीय वाढ झाली आहे. २ जानेवारी रोजी सोने १,३५,७६१ रुपये प्रति १० ग्रॅम होते. शुक्रवारी ते किरकोळ वाढीसह १,३८,८७५ रुपयांवर बंद झाले. आठवडाभरात सोने ३,११४ रुपयांनी महागले आहे. सोन्याचा आतापर्यंतचा ऐतिहासिक उच्चांक १,४०,४६५ रुपये आहे. या किमतीच्या तुलनेत सोने अजूनही १,५९० रुपयांनी स्वस्त आहे.


























































