माजी आमदार गंगाधर महाळप्पा पटणे यांचे निधन

बिलोली-देगलूर मतदार संघाचे माजी आमदार, माजी विधान परिषद सदस्य, प्रदीर्घ काळ नगराध्यक्ष पद भूषवलेले  गंगाधर महाळप्पा पटणे यांचे आज निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना निधन झाले.

14 एप्रिल 1941 रोजी त्यांचा बिलोली येथे जन्म झाला. बिलोलीच्या जिल्हा परिषद शाळेत त्यांनी आपले शालेय शिक्षण घेतले. पुढील शिक्षण त्यांनी तेंव्हाच्या मराठवाडा विद्यापीठात छत्रपती संभाजीनगर येथे घेतले आणि कायद्याची पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिले. जनता पार्टीचे बापू काळदाते, अनंत भालेराव, डॉ.राममनोहर लोहिया, गोविंदभाई श्रॉफ, मधू दंडवते यांच्यासोबत काम करुन त्यांनी सामाजिक कार्याचा पाया रचला. 1974 मध्ये थेट नगराध्यक्ष पदाच्या बिलोली येथील निवडणुकीत ते निवडून आले. 1981 पर्यंत ते बिलोलीचे नगराध्यक्ष म्हणून काम करत राहिले. शहराच्या विकासाची तळमळ व विकासाचा ध्यास या माध्यमातून त्यांनी शहर विकासाची कामे केली. आंतर भारती शिक्षण संस्था नावाची संस्थाही त्यांनी स्थापन केली. यासोबतच ग्रंथालय चळवळीला बळ मिळावे म्हणून त्यांनी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत काम केले. सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयाला निधी मिळावी यासाठी त्यांनी विविध अधिवेशन घेतले. गांधी निर्माण गृहनिर्माण संस्थेचे तसेच विविध सेवा सहकारी सोसायटीचे ते अनेक वर्ष अध्यक्ष राहिले. 1986 ते 1991 पर्यंत ते बिलोलीचे नगराध्यक्ष म्हणून कार्यरत राहिले. त्यानंतर महाराष्ट्र स्टेप को-ऑप.हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशन ते नांदेड जिल्ह्याचे तीनवेळा संचालक म्हणून कार्यरत होते. याच संस्थेत त्यांची 1991-92 या काळात उपाध्यक्ष म्हणून निवड झाली होती.

जनता पार्टीच्या वतीने त्यांनी 1978 साली निवडणूक लढवली. आणि ते बिलोली-देगलूरचे आमदार म्हणून कार्यरत राहिले. जनक्रांती या साप्ताहिकाचे त्यांनी संपादक म्हणून काम हाती घेतले आणि हे वर्तमानपत्र शेवटपर्यंत चालविले. 1972 साली देखील विधान सभेची निवडणूक लढवली मात्र त्यावेळी ते पराभूत झाले. त्यानंतर 1994 साली त्यांची विधान परिषदेवर निवड झाली. सांस्कृतिक ठेवा कायम राहावा व लोककलेचा विकास व्हावा यासाठी त्यांनी बिलोलीत लावणी महोत्सव सुरु केला. शहरातील व तालुक्यातील विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची आखणी त्यांनी केली. ग्रंथालय चळवळीच्या माध्यमातून त्यांनी अनेक वर्ष काम पाहिले. या माध्यमातून राज्यभरात ग्रंथालय चळवळ विकसित करण्यासाठी त्यांनी विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र,उर्वरित महाराष्ट्र याठिकाणी वेगवेगळे ग्रंथालय संघाचे अधिवेशनही घेतले.

बिलोली शहराचा विकास चांगल्या पध्दतीने व्हावा यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. बिलोलीतील पठ्ठेबापूराव रंगमंच देखील त्यांनी उभारला. हुतात्मा गोविंदराव पानसरे शिक्षण संस्थेचे ते पदाधिकारी म्हणून काही काळ कार्यरत राहिले. हाऊसिंग फायनान्सच्या नांदेड जिल्हा संचालक पदी निवड झाल्यानंतर त्यांनी विविध गृहनिर्माण संस्थांना आर्थिक सहाय्य व कर्ज मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. मृत्यूपूर्वी त्यांनी देहदानाचा निर्णय घेतल्याने त्यांच्या कुटुंबियांच्या इच्छेनंतर नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्यांचा देह सुपूर्द केला. तत्पूर्वी त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी आज सायंकाळपर्यंत त्यांचे पार्थिव त्याठिकाणी ठेवण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, सून, दोन नातू असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने समाजवादी विचाराचा एक ज्येष्ठ नेता जिल्ह्याने गमावल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.