भाजपा बलात्काऱ्यांनाही संधी देणारा पक्ष, बेटी बचाव बेटी पढाव नाही तर भाजपापासून बेटी बचाव: हर्षवर्धन सपकाळ

भारतीय जनता पक्ष स्वतःला पार्टी विथ डिफरन्स म्हणते पण ते वस्तुस्थिती तशी नाही. भाजपात गुंड, मवाली, माफिया यांना आमदार, खासदार, मंत्री केले जाते, आता तर भाजपा बलात्काऱ्यांनाही पक्षात संधी देत आहे. बदलापूरमध्ये लहान मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला भाजपाने स्विकृत नगरसेवक करून विकृतीचा कळस गाठला आहे, असा घणाघाती हल्लाबोल करत भाजपाचा बेटी बचाव, बेटी पढाव, हा पोकळ नारा असून खरे तर भाजपापासून बेटी बचाव असे चित्र आहे असे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना रविवारी पनवेल मध्ये प्रचार केला. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, उन्नाव बलात्कारातील आरोपी भाजपचा आमदार आहे, उत्तराखंड मधील अंकिता भंडारी प्रकरणातही भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची नावे समोर आली आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव केलेल्या महिला खेळाडूंचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणात भाजपाच्या खासदाराचे नाव आलेले आहे आणि आता लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केलेल्या नराधमाला भाजपाने स्विकृत नगरसेवक पदी नियुक्त केले. भाजपाने सर्व मर्यादा, नैतिकता गुंडाळून ठेवली आहे.

भारतीय जनता पक्ष व एकनाथ शिंदे यांची शिवसेना सत्तेसाठी कोणाशीही युती करत आहे. अंबरनाथमध्ये काँग्रेसच्या १२ नगरसेवकांनी पक्षातील कोणालाही न विचारता भाजपाला पाठिंबा दिला हे समजताच त्यांना काँग्रेसने तात्काळ बडतर्फ केले. पण भाजपाने मात्र त्यांना त्यांच्या पक्षात घेतले. अकोटमध्ये ओवैसी यांच्या एमआयएम पक्षाशी युती केली तर शिंदे गटानेही एमआयएमशी युती केली. प्रचार मात्र खान महापौर होईल, खान हवा का बाण हवा, असे सांगून धार्मिक तेढ निर्माण करायची आणि सत्तेसाठी मात्र ओवैसींच्या पक्षाशी हातमिळवणी करायची, एवढ्या खालच्या स्तराला भाजपाचे राजकारण गेले आहे. हैदराबादचा दाढीवाला व ठाण्याचा दाढीवाला एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हा खेळ लोकांनी ओळखला आहे, असे सपकाळ म्हणाले..

हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ज्येष्ठ नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची स्थानिक जनतेची मागणी काँग्रेस पक्षाने सातत्याने लावून धरली आहे. नवी मुंबई विमान तळावरून जेव्हा पहिले उड्डाण होईल त्यावेळी दि. बा. पाटील विमानतळ अशी उद्घोषणा ऐकायला येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते पण अद्याप विमानळाला नाव दिलेले नाही, हा भाजपाचा कोडगेपणा आहे. देवेंद्र फडणवीस १२ तारखेला पनवेल भागात प्रचारासाठी येणार आहेत, सध्या आचारसंहिता सुरु आहे पण आचारसंहिता संपल्यानंतर दुसऱ्या दिवशीच दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला दिल्याचा निर्णय होईल, असे फडणवीस यांनी या सभेतच जाहीर करावे, असे आव्हान हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहे.

यावेळी शेकाप नेते व माजी आमदार जयंत पाटील, ज्येष्ठ काँग्रेस नेते आर. सी. घरत, माजी आमदार बाळाराम पाटील, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व पनवेलचे प्रभारी झिशान अहमद, पनवेल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, श्रुती म्हात्रे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते.