Photo – मुंबईत शिवशक्तीच्या प्रचाराचा धडाका

मुंबईत रविवारी शिवशक्तीच्या प्रचाराचा धडाका पाहायला मिळाला. शिवसेना नेते–युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सकाळपासूनच प्रचारात उतरले होते. वांद्रे, खेरवाडीसह परळमध्येही प्रचारसभा, प्रचारफेरी, बाईक रॅली, शोभायात्रेत ते सहभागी झाले. शिवशक्तीच्या या प्रचाराला नागरिकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला.

वांद्रे न्यू गव्हर्नमेंट कॉलनी येथे प्रभाग क्र. 93 च्या उमेदवार रोहिणी कांबळे यांच्या तर वांद्रे पूर्वमधील प्रभाग क्र. 96 च्या उमेदवार सना खान यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे यांनी सभा घेतल्या. प्रभाग क्र. 92 मधील उमेदवार अरुण कांबळे यांच्या प्रचारासाठी आयोजित प्रचारफेरीत ते सहभागी झाले. त्यानंतर खेरवाडी येथे प्रभाग क्र. 95 मधील उमेदवार हरी शास्त्राr यांच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या भव्य बाईक रॅलीतही ते सहभागी झाले होते. या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

वांद्रे पूर्व येथील प्रभाग क्रमांक 96 च्या शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस शिवशक्तीच्या उमेदवार सना खान यांच्या प्रचारासाठीही आदित्य ठाकरे यांनी प्रचारसभा घेतली. या सभेला अलोट गर्दी उसळली होती. या गर्दीला संबोधित करताना आदित्य ठाकरे यांनी शिवशक्तीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.

विजय आपलाच होणार!

प्रभाग क्र. 94 च्या उमेदवार प्रज्ञा भूतकर यांच्या प्रचारासाठी विभागात शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी संवाद साधला आणि आपल्या मुंबईसाठी एकजूट दाखवूया, अशी साद सर्वांना घातली. प्रभाग क्र. 87 मधील उमेदवार पूजा महाडेश्वर यांच्या प्रचार रॅलीला उपस्थित राहून आदित्य ठाकरे यांनी तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने विजय आपलाच होणार, असा विश्वास व्यक्त केला. परळमध्येही आदित्य ठाकरे प्रचारात उतरले. प्रभाग क्र. 203 मधील उमेदवार भारती पेडणेकर यांच्यासमवेत त्यांनी महिला मतदारांशी संवाद साधला.