
विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून थोडी घाईने निवृत्ती घेतलीय. त्याच्यातील धावांची भूक, जिद्द आणि वेडेपणा इतका प्रचंड आहे की, तो 2027 वन डे विश्वचषकापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठामपणे टिकून राहील, असा विश्वास दक्षिण आफ्रिकेचा माजी महान वेगवान गोलंदाज अॅलन डोनाल्डने व्यक्त केला.
2014-15 च्या आयपीएल हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा गोलंदाजी प्रशिक्षक असताना विराटसोबत काम केलेल्या डोनाल्डने त्याच्या खेळाच्या तत्त्वांवर भर दिला. फिटनेस आणि खेळावरील आसक्तीच्या बाबतीत विराटसारखी भूक मी कुणात पाहिली नाही. तो स्वतःला फिट ठेवण्यात चॅम्पियन आहे. कुणीही त्याच्यासारखी मेहनत करत नाही. तो अक्षरशः एक मशीन आहे. मला आजही कसोटी क्रिकेटमध्ये त्याची कमतरता प्रकर्षाने जाणवते, असे भावुक शब्दांत डोनाल्ड म्हणाला.
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये विराटला खेळताना पाहायला मिळेल याबाबत डोनाल्ड ठाम आहे. मात्र कसोटीतून तो लवकर निवृत्त झाला, पण वन डे आणि विश्वचषकात आपण त्याला नक्की पाहू, असे त्याने स्पष्ट केले.
आगामी टी-20 विश्वचषकाबाबत बोलताना डोनाल्डने दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे कौतुक केले. 7 फेब्रुवारीपासून हिंदुस्थान आणि श्रीलंका संयुक्तपणे आयोजित करणाऱया या स्पर्धेत सामना जिंकणे गोलंदाजांसाठी किती अवघड असेल यावर त्याने भाष्य केले. हिंदुस्थानातील खेळपट्टय़ा जगातील सर्वोत्तम टी-20 खेळपट्टय़ा आहेत. तिथे गोलंदाजी करणे फार कठीण आहे. आयपीएलमध्ये पॉवर प्लेमध्ये 120 हून अधिक धावा होताना मी पाहिल्या आहेत. ती फलंदाजीची कला आहे, असे तो म्हणाला.

























































