
महाराष्ट्रात जिल्हा परिषदा निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोगाला 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. राज्य निवडणूक आयोगाकडून मुदतवाढीसाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपुढे वाढवलेली नाही, तिथे 10 दिवसांची मुदतवाढ द्यावी, अशी राज्य निवडणूक आयोगाकडून मागणी करण्यात आली होती.
निवडणूक आयोगाची ही मागणी आता सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली आहे. त्यामुळे 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ज्या जिल्हा परिषदांमध्ये ओलांडली गेलेली नाही, त्या निवडणुका 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत पूर्ण करता येणार आहेत. न्यायालयाचा हा आदेश फक्त 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितीसाठी आहे, ज्या ठिकाणी आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांच्यापुढे ओलांडली गेलेली नाही. इतर सर्व जिल्हा परिषदांबाबत पुन्हा 21 जानेवारीला सुनावणी होणार आहे.




























































