
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात संगमेश्वर चौकात पुकारण्यात आलेल्या महामार्ग रोको आंदोलनात एका मातेने आपल्या दोन वर्षांच्या चिमुकल्यासह थेट रस्त्यावर उतरून शासन आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. मुंबईहून आलेली मीना ही महिला आपल्या तान्ह्या मुलाला घेऊन कोणतीही भीती, कोणतीही तक्रार न करता आंदोलनस्थळी ठाण मांडून बसली होती.
सकाळच्या थंड वातावरणापासून दुपारच्या प्रखर उन्हापर्यंत ही माता आपल्या लेकराला जवळ घट्ट धरून रस्त्यावर बसलेली होती. त्या चिमुकल्याच्या हातात जनआक्रोश समितीचा फडकणारा झेंडा दिसत होता. दोन वर्षांचे हे बाळ जणू काही या लढ्याचे भविष्यच हातात घेऊन उभे असल्याचे चित्र उपस्थितांना अस्वस्थ करणारे आणि तितकेच प्रेरणादायी ठरले.
एका आईने आपल्या बाळाच्या सुरक्षित भविष्यासाठी महामार्गावर बसण्याचा घेतलेला हा निर्णय तिच्या धैर्याचे आणि निर्धाराचे प्रतीक ठरला. “आम्हाला आमच्या मुलांचा जीव प्रिय आहे,” हा मूक संदेश त्या मातेच्या उपस्थितीतून ठळकपणे व्यक्त होत होता. अनेक आंदोलक आणि नागरिकांनी या मातेच्या धाडसाचे कौतुक केले, तर काहींच्या डोळ्यांत पाणीही आले. या दृश्यामुळे आंदोलनाला वेगळीच धार मिळाली. महामार्गाचे रखडलेले काम, अपघातांत जाणारे जीव आणि प्रशासनाची उदासीनता याविरोधातील आक्रोश या आई–बाळाच्या उपस्थितीने अधिक तीव्र झाला.
नागरिकांना आपल्या चिमुकल्यांना घेऊन रस्त्यावर उतरावे लागणे हे व्यवस्थेचे अपयश असल्याची भावना यावेळी प्रकर्षाने व्यक्त झाली. आई आणि बाळाच्या या धैर्याने संगमेश्वरातील महामार्ग रोको आंदोलन केवळ आंदोलन न राहता, तो शासनासाठी एक गंभीर इशारा ठरला आहे. मुंबई–गोवा महामार्गावर सुरक्षितता आणि कामाची गती कधी येणार, हा प्रश्न आता एका आईच्या डोळ्यांतून प्रशासनाला विचारला जात आहे.





























































