
मुंग्या एक एक कण गोळा करून वारूळ बनवतात, पण वारूळ तयार झाले की त्यात मुंग्या नाहीत तर नाग राहतात. आरएसएसचे कार्यकर्ते आणि भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी उभारलेल्या वारुळात भ्रष्टाचारी, बलात्कारी, गुंड आणि तडीपार नाग राहायला आले आहेत आणि निष्ठावान केशव-माधव मात्र चादरी उचलत आहेत असे जोरदार तडाखे शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपला लगावले.
शिवतीर्थावरील झालेली शिवसेना-मनसेची सभा पाहून सध्या भाजपावाल्यांना जिथे तिथे ठाकरे बंधू दिसत आहेत. त्यामुळे भाजप नेते हा प्रीतीसंगम नाही तर भीतीसंगम आहे असे म्हणतात. सत्तेसाठी एकत्र आलो असे मल्लिनाथी ते करतात. मग तुम्ही सुरत, गुवाहाटीला मोक्षप्राप्तीसाठी गेला होतात का, असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला. धर्मवीरांच्या नावाने जपनाम करणाऱया गद्दारांना ठाण्यात अजूनही धर्मवीरांची कमान उभारता आली नाही. कणा गायब झालेल्या गद्दारांनी धर्मवीरांची कमान गायब केली. मिंधे फक्त सत्तेसाठी हपापले आहेत हे ठाणेकरांना कळून चुकले आहे. त्यामुळे आजची ठाकरे बंधूंची सभा गेमचेंजर ठरेल आणि ठाण्यात शिवसेना -मनसेची ताकद दिसेल असा विश्वासही अंधारे यांनी व्यक्त केला. काँग्रेस, एमआयएम यांच्याशी युती करून फडणवीस यांनी भाजपचा खरा चेहरा दाखवून दिला आहे. मुंबई, ठाण्यासह राज्यात फडणवीस यांना पराभवाची भीती आहे. त्यामुळेच त्यांना ठाकरे ब्रँडने पछाडले आहे असा हल्लाबोलही त्यांनी केला.






























































