
मुंबई महानगरपालिका निवडणुकीनिमित्त धारावीतील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. धारावीतील सर्व पात्र झोपडीधारकांना 350 चौरस फुटांची घरे देणार असे फडणवीस यांनी त्या सभेत आश्वासन दिले होते. त्याबद्दल धारावीकरांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. पात्र-अपात्र असा खेळ करू नका. 350 चौरस फुटांची घरे घाला चुलीत, सर्व धारावीकरांना 500 चौरस फुटांची घरे द्या, असे धारावी बचाव आंदोलनाने फडणवीस यांना बजावले आहे.
धारावी बचाव आंदोलनाने सुरुवातीपासून 500 चौरस फुटांच्या घरासाठी आग्रह धरला आहे. धारावीत सवा लाख झोपडय़ा आहेत. या सर्व झोपडय़ा सरसकट पात्र करा, अशी मागणी धारावी बचाव आंदोलनाचे नेते, शिवसेनेचे माजी आमदार बाबुराव माने व अन्य नेत्यांनी सरकारकडे केली आहे.
80 टक्के धारावीकरांना डंपिंग ग्राऊंडवर फेकण्याचा डाव
धारावीत चार-पाच सर्वेक्षणे झाली. त्यात धारावीतील 80 टक्के लोकांना अपात्र ठरवण्याचा पालिका, एसआरए आणि अदानींचे धोरण असल्याचा गंभीर आरोप माने यांनी केला. फक्त 20 टक्के धारावीकरांनाच धारावीत घरे मिळणार आणि बाकीचे रहिवासी देवनार, मुलुंडच्या डंपिंग ग्राऊंडवर फेकले जाणार, असा संताप माने यांनी व्यक्त केला.



























































