तात्काळ इराण सोडा! अमेरिकेचे आपल्या नागरिकांना आदेश, कोणत्याही क्षणी लष्करी कारवाईची शक्यता

इराणमधील वाढता हिंसाचार आणि गृहयुद्धासारख्या परिस्थितीमुळे अमेरिकेने अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ‘वॉर मोड’मध्ये आले आहेत. सध्याची परिस्थिती पाहता अमेरिकन दूतावासाने आपल्या नागरिकांना तात्काळ इराण सोडण्याचे आदेश जारी केले आहेत. अमेरिका कोणत्याही क्षणी इराणवर लष्करी कारवाई करण्याची शक्यता आहे. व्हाईट हाऊसने याबाबत संकेत दिल्यामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे.

वाढती महागाई, ढासळलेली अर्थव्यवस्था आणि प्रशासनाविरोधात इराणमध्ये जनतेचा उद्रेक झाला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून इराणच्या अनेक प्रांतांमध्ये हिंसक निदर्शने सुरू आहेत. हे आंदोलन चिरडण्यासाठी सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत 550 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 10 हजारांहून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. इराण सरकारने इंटरनेट आणि दळणवळणाची साधने बंद केल्याने ही परिस्थिती आणखी चिघळली. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेने आपल्या नागरिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली असून ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे.

इराणमधील निदर्शने अत्यंत हिंसक वळ घेऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त करत अमेरिकेने आपल्या नागरिकांना सरकारच्या मदतीची वाट न पाहता इराण सोडण्याचे आदेश दिले आहेत. विमान सेवा विस्कळीत असल्याने नागरिकांनी तुर्की किंवा आर्मेनिया मार्गे रस्त्याने बाहेर पडावे. ज्यांना बाहेर पडणे शक्य होणार नाही त्यांनी पुरेसा अन्नसाठा आणि औषधे जमा करून सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असे आदेश अमेरिकेने आपल्या नागरिकांना दिले आहेत.

ज्यांच्याकडे अमेरिका आणि इराण अशा दोन्ही देशांचे नागरिकत्व आहे, त्यांना इराणमध्ये अटक होण्याचा मोठा धोका आहे. इराण सरकार दुहेरी नागरिकत्व मान्य करत नसल्याने अशा नागरिकांना इराणी समजून त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.

दरम्यान, इराणमधील वाढता तणाव पाहता अनेक आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी 16 जानेवारीपर्यंत आपली सेवा स्थगित केली आहे. इंटरनेट नसल्यामुळे संपर्क करणे कठीण झाले असून इराणमध्ये सध्या दहशतीचे वातावरण आहे. ही परिस्थिती आणखी चिघळली तर अमेरिका लष्करी कारवाई करू शकते. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेव्हिट यांनी याबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत. हवाई हल्ल्याचा पर्याय खुला असल्याचे त्या म्हणाल्या.