
पश्चिम बंगालमध्ये जीवघेण्या निपाह व्हायरसची दोन संशयित प्रकरणे समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. 2001 नंतर राज्यात प्रथमच निपाहचे संशयित रुग्ण आढळल्याने केंद्र सरकार तातडीने ॲक्शन मोडमध्ये आले आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून केंद्र सरकारने एक उच्चस्तरीय मल्टिडिसिप्लिनरी पथक बंगालमध्ये रवाना केले आहे. या पथकामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजी आणि पर्यावरण व वन मंत्रालयातील वन्यजीव विभागाच्या तज्ज्ञांचा समावेश आहे. हा विषाणू प्राण्यांकडून माणसात पसरणारा (झुनोटिक) असून त्याचा मृत्यूदर अत्यंत उच्च असल्याने केंद्र आणि राज्य स्तरावर कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवल्या जात आहेत.
राज्याच्या मुख्य सचिव नंदिनी चक्रवर्ती यांनी या घटनेला दुजोरा दिला असून, संशयित आढळलेल्या दोन्ही व्यक्ती परिचारिका असल्याची माहिती दिली आहे. या दोघींवरही सध्या त्यांच्याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या परिचारिकांना नेमकी लागण कशी झाली, याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. तपासणीदरम्यान असे समोर आले आहे की, या दोन्ही परिचारिकांनी काही दिवसांपूर्वी पूर्व वर्धमान जिल्ह्याचा दौरा केला होता. त्यामुळे आता उत्तर 24 परगणा, पूर्व वर्धमान आणि नादिया या जिल्ह्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. प्रशासनाकडून अत्यंत वेगाने ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ची प्रक्रिया राबवली जात आहे. संशयित परिचारिकांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीची ओळख पटवून त्यांची वैद्यकीय चाचणी केली जात आहे. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने कडक दक्षता घेण्याचे आदेश दिले असून आपत्कालीन मदतीसाठी तीन हेल्पलाइन क्रमांकही सक्रिय केले आहेत. मुख्य सचिवांनी जनतेला आश्वासन दिले आहे की, सरकार परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष ठेवून असून संसर्ग रोखण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जात आहेत.
निपाह विषाणू हा प्रामुख्याने फळे खाणाऱ्या वटवाघळांद्वारे पसरतो. याशिवाय डुकरांसारख्या पाळीव प्राण्यांमार्फत आणि बाधित माणसाकडून दुसऱ्या माणसाकडेही या विषाणूचा प्रसार होऊ शकतो. हा आजार थेट मेंदूवर हल्ला करत असल्याने (एन्सेफलायटीस) तो अत्यंत घातक ठरतो. जागतिक आकडेवारीनुसार, या विषाणूचा मृत्यूदर 40 ते 75 टक्क्यांपर्यंत आहे. सर्वात चिंतेची बाब म्हणजे यावर अद्याप कोणतेही विशिष्ट औषध किंवा लस उपलब्ध नसल्याने केवळ प्रतिबंधात्मक उपाय आणि तातडीचे उपचार हाच एकमेव मार्ग उरतो. त्यामुळे नागरिकांनी वैयक्तिक स्वच्छता पाळणे, फळांचे सेवन करताना काळजी घेणे आणि संशयित लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधणे आवश्यक आहे.


























































