सीमेपलीकडे 8 दहशतवादी तळ सक्रिय; कुरापत केल्यास सडेतोड प्रत्युत्तर देऊ, लष्करप्रमुख जनरल द्विवेदी यांचा पाकला इशारा

हिंदुस्थानचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी सीमेपलीकडील दहशतवादी हालचालींबाबत पाकिस्तानला अत्यंत कडक शब्दांत इशारा दिला आहे. सीमेपलीकडे अद्यापही दहशतवाद्यांचे आठ ट्रेनिंग कॅम्प सक्रिय असून हिंदुस्थानच्या सैन्य त्यांच्या प्रत्येक हालचालींवर बारीक नजर ठेवून असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या तळांवरून कोणतीही कुरापत झाली, तर भारतीय लष्कर त्याला सडेतोड उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, असा सज्जड दम जनरल द्विवेदी यांनी यावेळी दिला.

लष्करप्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या सक्रिय असलेल्या आठ दहशतवादी तळांपैकी दोन आंतरराष्ट्रीय सीमेजवळ, तर सहा नियंत्रण रेषेजवळ आहेत. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे लष्कराकडून या भागाची सातत्याने पाहणी करण्यात येत असून, या कॅम्पांमध्ये सध्या 100 ते 150 दहशतवादी असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या दहशतवादी अड्ड्यांमधून कोणतीही संशयास्पद हालचाल झाल्यास हिंदुस्थानचे सैन्य पुन्हा एकदा मोठी कारवाई करेल, असे त्यांनी ठामपणे सांगितले. ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा संदर्भ देत जनरल द्विवेदी म्हणाले की, या मोहिमेत लष्कराला मोठे यश मिळाले आहे. नऊपैकी सात लक्ष्यांचा खात्मा करण्यात आला आहे. 7 मे रोजी सुरू झालेली ही कारवाई 10 मे पर्यंत चालली आणि त्यानंतर जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर झालेल्या डीजीएमओ-स्तरीय बैठकीत दोन्ही देशांनी आपली अतिरिक्त सैन्य तैनाती कमी करण्याचा निर्णय घेतला असून, तणावाच्या काळात पुढे सरकवलेले सैन्य आता आपापल्या नियुक्त ठिकाणी परतले आहे.

या चर्चेदरम्यान अण्वस्त्रांबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे लष्करप्रमुखांनी स्पष्ट केले. अण्वस्त्रांबाबतची विधाने केवळ राजकीय किंवा सार्वजनिक व्यासपीठांवरून केली गेली असून लष्कराचा त्याच्याशी संबंध नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मात्र, हिंदुस्थानने प्रथमच अणु आणि पारंपरिक युद्धाच्या दरम्यानच्या क्षमतांचा वापर करून पाकिस्तानविरुद्ध कारवाई केली आहे. ज्यातून हिंदुस्थानची प्रत्येक पातळीवर प्रत्युत्तर देण्याची क्षमता सिद्ध झाली आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, जम्मू क्षेत्रात वारंवार दिसणाऱ्या पाकिस्तानी ड्रोनचा मुद्दा हिंदुस्थान-पाकिस्तान डीजीएमओ-स्तरीय चर्चेत उपस्थित करण्यात आला आहे. अशा कारवाया त्वरित थांबवण्याचे निर्देश हिंदुस्थानने दिले आहेत. पाकिस्तान कदाचित ड्रोनच्या माध्यमातून हिंदुस्थानच्या लष्करी सज्जतेची चाचणी घेत असावा, अशी शक्यताही लष्करप्रमुखांनी व्यक्त केली आहे. हिंदुस्थानी सैन्य सध्या पूर्णपणे सतर्क असून कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यास सज्ज आहे.