भाजपचं सरकार आलं तर मुंबईचं नाव बदलून अदानीस्तान करतील, आदित्य ठाकरेंचा मतदारांना सावधगिरीचा इशारा

महानगरपालिका निवडणुकांसाठी 15 जानेवारीला 29 महानगरपालिकांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. आज (13 जानेवारी 2025) प्रचाराचा शेवटचा दिवस असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अण्णामलाई यांच्यावर सडकून टीका केली. भाजपचं जर सरकार आलं तर मुंबईचं नाव बदलून अदानीस्थान करतील, अशी भीतीही आदित्य ठाकरेंनी यावेळी व्यक्त केली.

प्रचारा दरम्यान आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, “पंधरा तारखेला जेव्हा मतदान होईल, तेव्हा शिवशक्तीसाठी (मशाल, इंजिन आणि तुतारी) मतदान होईल. कारण सगळे नागरिक आमच्यासोबत आहेत.” लाडकी बहीण योजनेचे डिसेंबरपर्यंतचे पैसे आता खात्यामध्ये जमा केले जात आहेत, यावरून आदित्य ठाकरेंनी फटकारलं आणि ते म्हणाले की, “सरकारने लोकांना कितीही फसवायचा प्रयत्न केला तरी लोकं आता फसणार नाहीत.”

देवेंद्र फडणवीसांच्या नकलीवरून आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारलं असता, आदित्य ठाकरेंनी फडणवीसांचा समाचार घेतला. “मला नक्कल जमत नसेल, पण यांना कारभार जमत नाही, त्यावर त्यांनी विचार करावा. भाजपचा स्वत:चा जो विकास झालाय आमच्यासोबत 25 वर्षे राहून तो त्यांनी पाहावा”, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला.

मुख्यमंत्र्यांच्या लाव रे तो व्हिडीओचा घेतला खरपूस समाचार. म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी दोन-तीन अजून व्हिडीओ पाहावेत. नितीश कुमार नरेंद्र मोदींबद्दल काय-काय बोललेत, नंतर मोदींनी त्यांच्यासोबत युती का केली? चंद्रबाबू मोदींबद्दल काय काय बोललेत, मोदींनी त्यांच्यासोबत युती का केली? संघमुक्त भारत नितीश कुमारांना पाहिजे होता, त्यांच्यासोबत भाजप गेलेली आहे. ती युती का केली? हा पण युतीचा त्यांनी व्हिडीओ पाहावा, जी युती भाजपने PDP सोबत केली होती. त्यामुळे पहिलं हे सगळं पाहावं आणि नंतर बोलावं. एक मिंधेंचा सुद्धा व्हिडीओ रडतानाचा आहे. त्यांचं नेहमी रडगाणं सुरूच असतं की, मला या युतीमध्ये बसता येत नाही”, मिमिक्री करत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंनाही टोला लगावला.

“रसमलाईवर जास्त मला बोलायचं नाहीये, जर चांगलं काम करणारे लोकं आपल्याला पाहिजे असतील तर, अण्णामलाईंनी स्टॅलिन यांच्याकडे पाहावं. स्टॅलिन यांनी मुख्यमंत्री म्हणून जे काम केलं आहे. आज तामिळनाडू कुठच्या कुठे जात आहे. आणि त्याचमुळे अण्णामलाईंना स्वत:चं डिपॉझीटही सांभाळता आलं नाही. झीरो माणलासा किंमत देऊ नका. पण हीच भाजपची वृत्ती आहे की, आमच्या राज्यामध्ये येऊन, आमच्या शहरामध्ये येऊन विभाजन करणं आणि दंगली घडवणं. भाजपचं जर सरकार आलं तर मुंबईचं नाव बदलून अदानीस्तान करतील”, असा सावधगिरीचा इशारा आदित्य ठाकरेंनी मतदारांना दिला आहे.