
लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी वार्षिक पत्रकार परिषदेत ड्रोन आणि क्षेपणास्त्र दलाची सैन्याला सर्वाधिक गरज असल्याचे मत व्यक्त केले. सध्याच्या काळात ड्रोन आणि क्षेपणास्त्र यांची सैन्य दलाला अत्यंत गरज आहे. चीन आणि पाकिस्तानने स्वतःचे ड्रोन आणि क्षेपणास्त्र दल स्थापन केले आहे. त्यामुळे काळाची गरज म्हणून आपल्या सैन्याकडेही ड्रोन आणि क्षेपणास्त्रे असणे गरजेचे आहे, तसेच ड्रोन आणि क्षेपणास्त्र दल स्थापन करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
चीन आणि पाकिस्तानच्या क्षेपणास्त्रे आणि ड्रोन यांना प्रत्युत्तर देण्यासाठी हिंदुस्थानी सैन्यालाही आपले क्षेपणास्त्र आणि ड्रोन शक्ती वाढवावी लागणार आहे. आपल्याला क्षेपणास्त्र आणि ड्रोन दलाची गरज आहे. आम्ही रॉकेट आणि क्षेपणास्त्र दलाच्या दिशेने काम करत आहोत. चीन आणि पाकिस्तानने अशा दलांची स्थापना केली आहे. हिंदुस्थानने आधीच १५० किलोमीटर आणि ४५० किलोमीटर पल्ल्याच्या रॉकेट प्रणालींचा समावेश केला आहे आणि आता आपण लांब पल्ल्याच्या क्षमतांवर काम करत आहोत, असे त्यांनी सांगितले.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर (एलओसी) गोळीबारात १०० पाकिस्तानी सैन्य सैनिक ठार झाले. आठ दहशतवादी तळ अजूनही सक्रिय आहेत, त्यापैकी सहा नियंत्रण रेषेच्या पलीकडे आणि दोन आंतरराष्ट्रीय सीमेजवळ आहेत. लष्कर या भागांवर सतत लक्ष ठेवून आहे आणि आवश्यक असल्यास योग्य कारवाई करेल. जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थिती संवेदनशील आहे, परंतु पूर्णपणे नियंत्रणात आहे. २०२५ मध्ये आतापर्यंत ३१ दहशतवादी मारले गेले आहेत, त्यापैकी ६५ टक्के परदेशी नागरिक होते आणि त्यापैकी बहुतेक पाकिस्तानी होते, अशी माहितीही त्यांनी दिली.


























































