मी काही माता सीता नाही, आध्यात्मिक मार्ग सोडण्याचा हर्षा रिछारियाचा निर्णय

प्रयागराज महाकुंभमेळ्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हर्षा रिछारियाने आध्यात्मिक मार्ग सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षभरापासून आध्यात्मच्या वाटेवर चालणाऱ्या हर्षाने अत्यंत व्यथित होऊन हा मार्ग सोडत असल्याचे जाहीर केले. आपले मनोधैर्य जाणीवपूर्वक तोडण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप तिने केला आहे.

हर्षाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करत आपली कैफियत मांडली आहे. तिने म्हटले की, प्रयागराज महाकुंभ 2025 पासून सुरू झालेला तिचा हा आध्यात्मिक प्रवास आता संपुष्टात आला आहे. या संपूर्ण वर्षभरात तिला प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला. मी कोणतेही चुकीचे काम करत नव्हते, ना चोरी ना कोणावर अत्याचार, तरीही आध्यात्मच्या मार्गावर चालताना पावलोपावली अडथळे निर्माण केले गेले, असे हर्षाने या व्हिडिओत नमूद केले.

स्वतःच्या आर्थिक स्थितीबाबत भाष्य करताना हर्षाने स्पष्ट केले की, अनेकांना असे वाटते की मी आधात्मच्या नावाखाली कोट्यवधी रुपये कमावले आहेत. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की मी सध्या कर्जात बुडालेली आहे. आध्यात्म स्वीकारण्यापूर्वी मी एक यशस्वी अँकर होती आणि स्वाभिमानाने चांगले पैसे कमावत होती. मात्र, आध्यात्मिक प्रवासात केवळ एकटे पाडण्यात आले नाही तर बदनामी करून मनसिक खच्चीकरण करण्याचे प्रयत्न झाले. तुम्ही एखाद्या मुलीचे मनोधैर्य तोडू शकत नसाल तर, तिची बदनामी करा, म्हणजे ती स्वतःहून तुटेल, अशा शब्दांत तिने आपला संताप व्यक्त केला आहे.

आपल्या निर्णयावर ठाम राहताना हर्षाने ठणकावून सांगितले की, तुमचा धर्म तुमच्याकडेच ठेवा. मी काही माता सीता नाही जी वारंवार अग्निपरीक्षा देईल. मी आतापर्यंत अनेक अग्निपरीक्षांमधून गेले आहे. आता माघ मेळ्यातील मौनी अमावस्येच्या दिवशी पवित्र स्नान करून मी माझा आध्यात्मिक संकल्प सोडणार आहे आणि पुन्हा माझ्या जुन्या कामाकडे परतणार आहे. हर्षाच्या या निर्णयामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.