
प्रयागराजच्या माघ मेळाव्यात भीषण आगीची घटना मंगळवारी घडली. या आगीत नारायण शुक्ल धाम छावणी जळून खाक झाली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यास सुरुवात केली. आगीत तंबू आणि इतर वस्तूही जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
नारायण शुक्ल धाम छावणीत एकूण 15 तंबू होते. यात सुमारे 50 यात्रेकरू राहत होते. छावणीत आग लागल्याचे पाहताच प्रसंगावधान राखत सर्वजण बाहेर धावले. आगीच्या घटनेमुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. अग्निशमन दलाच्या पाच गाड्यांनी घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली. आगीचे नेमके कारण अद्याप कळले नाही. मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.





























































