बिनविरोध निवडीवर आज सुनावणी

15 जानेवारी रोजी होणाऱ्या पालिका निवडणुकांपूर्वीच महायुतीचे 66 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. या प्रकरणी मनसेने हायकोर्टात याचिका दाखल केली असून बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या याचिकेवर उद्या बुधवारी मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. ठाण्यातील मनसे नेते अविनाश जाधव यांनी अॅड. असीम सरोदे यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे.

महायुतीतील पक्षांनी इतर पक्षांतील उमेदवारांना धमकावून तसेच आमिष दाखवून अर्ज मागे घेण्यास भाग पडल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करणे आवश्यक असून न्यायालयाच्या देखरेखीखाली विशिष्ट कालावधीत ही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. बिनविरोध विजयाचा दावा केलेल्या 68 जागांचे निकाल जाहीर करण्यास स्थगिती देण्यात यावी, त्याचबरोबर बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांसाठी किमान मतांच्या अनिवार्यतेबाबत विशिष्ट तरतूद करण्यासाठी कायदा तयार करण्याचे आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949मध्ये सुधारणा करण्याचे निवडणूक आयोगाला आदेश द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेवर उद्या बुधवारी मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर व न्यायमूर्ती गौतम अनखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.

उमेदवारांचे अर्ज जाणीवपूर्वक फेटाळले

नवी मुंबईतील उलवे नोड येथे राहणारे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पाटील यांनी हायकोर्टात अॅड. विनोद सांगवीकर यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. त्यांनी याचिकेत नमूद केले आहे की, राज्यातील 29 महापालिकांमधील सुमारे 69 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. यामुळे मतदारांना मतदानाचा आणि लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याचा मूलभूत अधिकार नाकारला जात आहे. याशिवाय अनेक उमेदवारांनी दबाव, भीती, आमिष तसेच राजकीय प्रभावाचा वापर केल्यामुळे आपली नामांकने मागे घेतली आहेत. इतकेच नव्हे तर, निवडणूक अधिकाऱयांनी काही उमेदवारांचे अर्ज जाणीवपूर्वक फेटाळले असून अधिकारांचा चुकीचा वापर केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणे गरजेचे असून, जोपर्यंत या प्रकरणाची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत संशयास्पद रीतीने बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांच्या निवडीला अंतिम मंजुरी देऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे. या याचिकेवरसुद्धा उद्या बुधवारी सुनावणी होणार आहे. निवडणूक जाहीर झालेल्या जिल्हा परिषदा रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशीव आणि लातूर.

दोन मते द्या

जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका एकाच वेळी होत आहेत. त्यामुळे प्रत्येक मतदाराला एक मत जिल्हा परिषदेच्या निवडणूक विभागासाठी आणि एक मत पंचायत समितीच्या गणासाठी द्यावे लागेल.