रसमलाई हे तामिळनाडूचे गद्दार; तामिळ जनतेने घेतला समाचार, शिवशक्तीला दिला पाठिंबा

तामिळनाडूचे नेते अण्णामलाई यांनी मुंबईचा बॉम्बे असा उल्लेख करत ‘बॉम्बे इज नॉट महाराष्ट्र सिटी!” असे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील जाहीर सभेत खास ठाकरे शैलीत त्यांचा खरपूस समाचार घेतला. त्यांच्या या भूमिकेला तामिळनाडूमधील जनतेने देखील पाठिंबा दिला आहे.

वुई द्रविडीयन या संस्थेने ट्विटरवर राज ठाकरे यांना उद्देशून एक पोस्ट लिहली आहे. ”प्रिय राज ठाकरे, तुम्ही ज्या रसमलाईचा उल्लेख केला तो तामिळनाडूचा गद्दार आहे. त्याला तामिळनाडूचा आवाज समजू नका. आमचे मुख्यमंत्री तसेच निवडून आलेल्या एकाही नेत्याने मराठी व महाराष्ट्राविरोधात वक्तव्य केलेलं नाही. ते अशी मुर्खासारखी विधानं करणार नाहीत. मुंबई हा मराठी व महाराष्ट्राचा अभिमान आहे. हे एका शाळकरी मुलाला देखील माहित आहे. या कमी बुद्धीच्या व्यक्तीला परिस्थितीची समज नाही”, असे वुई द्रविडीयन यांनी म्हटले आहे.