
ईव्हीएम मशीनला या मतदानाच्या वेळी आता ‘पाडू’ (Printing Auxiliary Display Unit – PADU) हे नवे अतिरिक्त यंत्र जोडले जाणार आहे. हे यंत्र ईव्हीएममधील कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिटसोबत जोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. रोहित पवार यांनी ट्विट करत पाडू मशीनसोबतच महाराष्ट्रात सुरू असलेल्या पैसेवाटपावरूनही सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
”राज्यात वेगवेगळ्या शहरात सर्रास पैसे वाटप केले जात असल्याचे असंख्य व्हिडिओ व्हायरल झाले असून यात सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेचाच समावेश आहे. पैसे वाटताना हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या कार्यकर्त्यांना पकडत आहेत. याच कारणांमुळं दोन्ही पक्ष एकमेकांच्या जीवावर उठले असून जीवघेणे हल्ले करत आहेत. त्यातच कुणालाही काडीचीही कल्पना न देता निवडणूक आयोगाने एक नवीन मशीन आणलं असून ते EVM ला जोडण्यात येणार असल्याचं समजतंय. हे मशीन काय आहे, कशाचं आहे आणि कशासाठी लावलं जातंय याची कुणालाही कोणतीही कल्पना नाही, याबाबत राज ठाकर आणि उद्धव ठाकरे यांनी काढलेला मुद्दा तर खूप धक्कादायक आणि लोकशाहीसाठी धोकादायक आहे. असं असेल तर निवडणुका घेण्याचा हा केवळ फार्स तर नाही ना? असंच करायचं असेल तर भाजपाने लोकशाहीच्या फोटोला हार घालून या निवडणुकीत त्यांचे सगळेच उमेदवार निवडून आले, असं तरी जाहीर करावं”, असे रोहित पवार म्हणाले.






























































