
>> भावेश ब्राह्मणकर
समुद्राप्रमाणे अथांग भासणारे सौर पॅनेल्स साकारून चीनने अभूतपूर्व असा पाम केला आहे. तब्बल 420 चौरस किमीवरील हे सौर पॅनेल्स सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरत आहेत. यातून चीनने नक्की काय साध्य केलं आहे?
समुद्रसपाटीपासून सुमारे 10,000 फूट उंचीवर जिथे हवा विरळ आहे आणि सूर्यप्रकाश अधिक तीव्र आहे, तिथे निळ्याशार काचेच्या पॅनेलचे एक अथांग महासागर पसरलेले दिसते. हे चित्र आहे ‘जगाचे छप्पर’ समजल्या जाणाऱ्या तिबेटी पठाराचे. चीननेओओ या दुर्गम आणि उंचावर असलेल्या प्रदेशात तब्बल 162 चौरस मैल (सुमारे 420 चौरस किलोमीटर) क्षेत्रफळावर सौर पॅनेलचे जाळे विणले आहे. ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या अहवालानुसार, हा केवळ एक ऊर्जा प्रकल्प नसून जागतिक हवामान बदल, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भू-राजकीय वर्चस्व यांच्या लढाईतील चीनचे एक महत्त्वाचे पाऊल आहे. चीनच्या किंगहाई प्रांतातील ‘तालातान सोलर पार्क’ हा जगातील सर्वात मोठय़ा सौर ऊर्जा प्रकल्पांपैकी एक आहे. याचे क्षेत्रफळ तब्बल चेन्नई महापालिका क्षेत्राएवढे मोठे आहे. इथे लावलेले सौर पॅनेल हे प्रसिद्ध ‘थ्री गॉर्जेस डॅम’च्या एकूण ऊर्जा क्षमतेच्या बरोबरीचे आहेत.
चीनने एवढय़ा उंचावरील तिबेटी पठाराची निवड का केली, याबाबत ठोस वैज्ञानिक कारणे आहेत. किंगहाई प्रांतात उंचावर हवा विरळ असल्याने वातावरणातील अडथळे कमी असतात आणि सूर्याचे किरण थेट व अधिक तीव्रतेने जमिनीवर पोहोचतात. कमी ढग, दीर्घकाळ सूर्यप्रकाश आणि विस्तीर्ण मोकळी जमीन या तिन्ही घटकांचा दुर्मिळ संगम तिबेटी पठारावर आढळतो. सौर पॅनेलसाठी उष्णतेपेक्षा प्रकाश महत्त्वाचा असतो. पठारावरील थंड हवेमुळे हे पॅनेल थंड राहतात आणि अधिक कार्यक्षमतेने वीज निर्मिती करतात. तसेच पठाराचा मोठा भाग निर्मनुष्य आणि सपाट आहे, ज्यामुळे सौर पॅनेल लावणे आणि त्यांची देखभाल करणे सोपे जाते. केवळ वीज निर्माण करून उपयोग नाही, तर ती सुरक्षितपणे साठवणे आणि हजारो मैल दूर असलेल्या शहरांपर्यंत पोहोचवणे हे मोठे आव्हान होते. मात्र, चीनने यासाठी अल्ट्रा-हाय-व्होल्टेज ट्रान्समिशन लाइन्सचे जाळे उभारले आहे. या माध्यमातून तिबेटमध्ये निर्माण झालेली वीज ही एक हजार मैलांहून अधिक लांब असलेल्या पूर्व किनारपट्टीवरील औद्योगिक शहरांपर्यंत किमान गळतीसह पोहोचवली जात आहे.
तालातान या प्रकल्पाचा एक महत्त्वाचा उद्देश म्हणजे चीनच्या वाढत्या डिजिटल गरजा पूर्ण करणे. आजच्या काळात ‘डेटा सेंटर्स’ आणि ‘एआय मॉडेल्स’ चालवण्यासाठी प्रचंड विजेची गरज लागते. तिबेटी पठारावरील स्वस्त आणि स्वच्छ वीज या डेटा सेंटर्ससाठी इंधन ठरत आहे. यामुळे चीनला जगातील एआय शर्यतीत आघाडी मिळवणे सोपे होणार आहे. या प्रकल्पाने स्थानिक पर्यावरणात एक रंजक बदल घडवून आणला आहे. सौर पॅनेलमुळे जमिनीवर सावली पडते, ज्यामुळे वाळवंटी भागात जमिनीतील आर्द्रता टिकून राहते आणि गवत उगवू लागले आहे. या गवताचा फायदा घेण्यासाठी स्थानिक मेंढपाळ तिथे मेंढय़ा चरायला नेतात. या मेंढय़ांना आता ‘फोटोव्होल्टेईक मेंढय़ा’ म्हटले जाते. हे गवत मेंढय़ांनी खाल्ल्यामुळे सौर पॅनेलभोवती कचरा साचत नाही आणि मेंढपाळांना चारा मिळतो हा एक प्रकारे पर्यावरणाचा आणि उद्योगाचा समतोल आहे. चीन सध्या जगातील 50 टक्क्यांपेक्षा जास्त सौर ऊर्जा क्षमता स्वतकडे राखून आहे आणि जगातील 80 टक्के सौर पॅनेलचे उत्पादन तिथेच होते.
अमेरिकेसारखे देश जेव्हा आपल्या जीवाश्म इंधन (कोळसा, गॅस) उद्योगाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, तेव्हा चीन वेगाने अक्षय ऊर्जेकडे वळत आहे. 2060 पर्यंत ‘कार्बन न्यूट्रल’ होण्याचे चीनचे ध्येय असून हे सौर प्रकल्प त्या दिशेने टाकलेले मोठे पाऊल आहे.
तालातान सौर प्रकल्पात तब्बल 70 लाख सौर पॅनेल्स लावण्यात आल्याचे सांगितले जाते. सध्या या प्रकल्पातून तब्बल 16 हजार गिगावॉट एवढी वीज निर्मिती होत आहे. लवकरच ती 18 हजार गिगावॉटपर्यंत पोहोचणार आहे. इतक्या मोठय़ा प्रकल्पाचे काही दुष्परिणामही संभवतात. तिबेटी पठार हे जैवविविधतेच्या दृष्टीने संवेदनशील क्षेत्र आहे. सौर पॅनेल्समुळे स्थानिक परिसंस्थेत बदल होण्याची शक्यता काही तज्ञ व्यक्त करत आहेत. मात्र, काही अभ्यासांनुसार सौर पॅनेल्समुळे जमिनीतील ओलावा टिकून राहतो आणि काही भागांत गवत वाढीस मदत होते. स्थानिक तिबेटी समाजाच्या जीवनशैलीवरही याचा परिणाम होत आहे. तथापि, इतक्या मोठय़ा प्रमाणावर निसर्गाशी केलेली ही छेडछाड दीर्घकाळात काय परिणाम करेल, यावरही पर्यावरणवाद्यांचे लक्ष आहे. पण सध्या तरी ‘जगाच्या छतावर’ चीनने आपल्या ऊर्जेच्या सामर्थ्याचा ध्वज फडकवला आहे.
चीन हा आजही जगातील सर्वात मोठा कार्बन उत्सर्जन करणारा देश आहे.कोळशावर आधारित ऊर्जा उत्पादनावर त्याची मोठी अवलंबित्व आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय दबाव आणि अंतर्गत प्रदूषणाच्या समस्यांमुळे चीनने नवीकरणीय ऊर्जेकडे मोठय़ा प्रमाणावर वळण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पुढील दशकांमध्ये कार्बन उत्सर्जन शिखरावर नेऊन नंतर ते कमी करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे.
जग झपाटय़ाने हवामान बदलाच्या उंबरठय़ावर उभे असताना स्वच्छ ऊर्जेच्या शोधात मोठय़ा राष्ट्रांमध्ये स्पर्धा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर चीनने घेतलेला एक निर्णय संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेत आहे. तिबेटी पठारावरील 162 चौरस मैलांचा सौर प्रकल्प म्हणजे केवळ तांत्रिक चमत्कार नाही, तर तो भविष्यातील जागतिक ऊर्जा राजकारणाचा संकेत आहे. चीन जगाला हे दाखवू इच्छितो की, स्वच्छ ऊर्जा ही केवळ पर्यावरण रक्षणासाठीच नव्हे, तर आर्थिक आणि तांत्रिक वर्चस्वासाठीही आवश्यक आहे. तिबेटी पठारावरील सौर पॅनेल्सचे निळे साम्राज्य केवळ विजेची निर्मिती करत नाही, तर ते भविष्यातील बदलत्या जगाचे प्रतीक आहे. हवामान बदलाच्या संकटाचा सामना करताना तंत्रज्ञान आणि निसर्ग यांची सांगड कशी घातली जाऊ शकते, याचे हे उत्तम उदाहरण आहे.
(लेखक पर्यावरण अभ्यासक आणि मुक्त पत्रकार आहेत)
[email protected]



























































