
>> संदीप पाटील
मेस्सीने केलेले ‘वाईन’मध्ये ‘स्प्राईट’ मिसळून पिणे आवडते, हे वक्तव्य व्हायरल झाले अन् अवघ्या काही दिवसांत कोका-कोला कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाली. शेअर्समधील हा ऐतिहासिक चढ-उतार आजच्या जगात ब्रँडची प्रतिमा केवळ उत्पादनाच्या गुणवत्तेवर नाही, तर ती कोणाशी जोडलेली आहे यावरही अवलंबून असते हे दाखवून देणारा आहे.
फुटबॉल जगतातील महानायक लिओनेल मेस्सी याच्या एका साध्या वक्तव्याने जागतिक बाजारपेठेत कशी खळबळ माजली, याचे एक धक्कादायक उदाहरण समोर आले आहे. मेस्सीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, त्याला ‘वाईन’मध्ये ‘स्प्राईट’ मिसळून पिणे आवडते. हे वक्तव्य व्हायरल झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांत कोका-कोला कंपनीच्या शेअर्समध्ये 4.5 ते 5 टक्क्यांची वाढ झाली आहे. मेस्सीच्या या आवडीमुळे कोका-कोलाच्या बाजार मूल्यात सुमारे 12.9 अब्ज डॉलर्सची (अंदाजे 1.07 लाख कोटी रुपये) भर पडली आहे. स्प्राईट हे कोका-कोला कंपनीचेच उत्पादन असल्याने मेस्सीच्या या विधानामुळे जगभरातील त्याच्या चाहत्यांनी स्प्राईट खरेदी करण्यासाठी गर्दी केली, ज्याचा थेट फायदा कंपनीला झाला.
लुझू टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत मेस्सीने मिश्कीलपणे सांगितले की, मला वाईन आवडते, पण जर मला लवकर रिलॅक्स व्हायचे असेल, तर मी त्यात स्प्राईट मिसळून पितो. त्याने गमतीने असेही म्हटले की, घरात तीन मुले सतत दंगा करत असतात, त्यांच्या अंगातली ऊर्जा पाहून कधी-कधी मी थकून जातो, अशा वेळी ही ड्रिंक मला थोडा एकांत आणि शांतता मिळवून देते. एवढय़ा एका विधानावरून इतकी प्रचंड आर्थिक उलाढाल होणे, हे आधुनिक अर्थकारणातील बदलत्या प्रवाहाचे द्योतक म्हणावे लागेल.
जागतिक अर्थकारणात आता केवळ कंपन्यांचे नफा-तोटा पत्रक महत्त्वाचे राहिले नसून प्रभावशाली व्यक्तींच्या आवडीनिवडीही तितक्याच निर्णायक ठरत आहेत. मेस्सीच्या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, डिजिटल युगात माहितीचा प्रवाह हा पारंपरिक जाहिरातींपेक्षा कितीतरी पटीने वेगवान आणि परिणामकारक आहे. सेलिब्रिटी जेव्हा एखाद्या उत्पादनाचा उल्लेख करतात, तेव्हा त्याचा परिणाम केवळ पी वाढण्यावर होत नाही, तर गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवरही होतो. कोका-कोला ही जगातील अशा कंपन्यांपैकी एक आहे, जिचे शेअर्स अत्यंत स्थिर मानले जातात. मात्र मेस्सीसारख्या जागतिक महानायकाने केलेल्या सकारात्मक विधानाने या कंपनीच्या समभागात झालेली वाढ गुंतवणूकदारांचा या ब्रँडच्या भविष्यातील वाढीवरचा विश्वास दर्शवणारी म्हणावी लागेल. लावलेला विश्वास होता.
इतिहासाच्या पानांवर अशा प्रकारच्या घटनांच्या काही प्रमुख नोंदी आढळतात. 2018 मध्ये अमेरिकन मॉडेल कायली जेनरने एकदा ट्विट केले होते की, आता कोणी स्नॅपचॅट वापरते का? की फक्त मीच नाही वापरत… किती वाईट आहे हे. या एका नकारात्मक ट्विटमुळे स्नॅपचॅटच्या मूळ कंपनीचे बाजारमूल्य काही तासांतच 1.3 अब्ज डॉलर्सनी (सुमारे 10 हजार कोटी रुपये) कोसळले होते. यावरून सेलिब्रिटींची नापसंती एखाद्या बडय़ा कंपनीलाही किती मोठा फटका देऊ शकते, हे दिसून आले.
जगप्रसिद्ध अब्जाधीश आणि टेस्ला कार इलॉन मस्क हे तर मध्यंतरीच्या काळात अशा प्रकारच्या विधानांनी बाजाराला हादरे देणारे मास्टर बनले होते. व्हॉट्सअॅपच्या वादात इलॉन मस्क यांनी केवळ ‘युज सिग्नल’ असे दोन शब्द ट्विट केले. याचा परिणाम इतका विचित्र झाला की, गुंतवणूकदारांनी घाईघाईत ‘सिग्नल अॅडव्हान्स’ नावाच्या एका पूर्णपणे वेगळ्या आणि छोटय़ा कंपनीचे शेअर्स खरेदी केले. यामुळे त्या कंपनीचे मूल्य काही दिवसांतच 5,000 टक्क्यांनी वाढले. मस्क यांच्या एका ट्विटमुळे ािढप्टो मार्केटमधील ‘डोजकॉइन’च्या किमतीतही वारंवार चढ-उतार पाहायला मिळाले आहेत. मध्यंतरी मस्क यांनी केलेल्या एका ट्विटनंतर बिटकॉईन या ािढप्टो करन्सीचा मार्केटमधील भाव तब्बल 17 टक्क्यांनी घटला होता. विशेष म्हणजे त्याआधी वर्षभरापासून बिटकॉईनचा भाव वाढत होता, परंतु मस्क यांनी ट्विटमध्ये टेस्लाची कार खरेदी करण्यासाठी बिटकॉईनचा वापर करता येणार नाही, तसेच बिटकॉईन ही चांगली संकल्पना आहे. मात्र पर्यावरणाचे नुकसान होता कामा नये असे म्हटले. या ट्विटपूर्वी ािढप्टो करन्सीचा भाव 54819 अमेरिकन डॉलर होता. तो 45700 डॉलरवर आला.
मेस्सीच्या अगदी उलट परिणाम जगप्रसिद्ध फुटबॉलपटू रोनाल्डोने 2021 मध्ये दाखवून दिला होता. एका पत्रकार परिषदेत त्याने कोका-कोलाच्या बाटल्या बाजूला सारून पाणी प्या असा संदेश दिला. यामुळे कोका-कोलाच्या बाजार मूल्यात 4 अब्ज डॉलर्सची घट झाली होती. रोनाल्डोची ही कृती आरोग्य जागृतीसाठी असली तरी कंपनीच्या शेअर होल्डर्ससाठी हे धक्कादायक ठरणारे होते.
जेव्हा एखादा सेलिब्रिटी अनपेक्षितपणे एखाद्या ब्रँडचा उल्लेख करतो, तेव्हा त्याला ‘ऑथेंटिक एंडोर्समेंट’ मानले जाते. पेड जाहिरातींच्या तुलनेत अशा विधानांवर लोकांचा विश्वास जास्त असतो. सध्याच्या काळात शेअर बाजारातील अनेक व्यवहार हे ‘अल्गोरिदम’द्वारे चालवले जातात. हे अल्गोरिदम सोशल मीडियावरील ट्रेंड्स आणि शब्दांचे विश्लेषण करतात. जेव्हा ‘मेस्सी’ आणि ‘स्प्राईट’ हे शब्द सकारात्मकसंदर्भात मोठय़ा प्रमाणावर वापरले जाऊ लागतात, तेव्हा ते संगणकीय प्रणालीला आपोआप खरेदीचे आदेश देतात. याचा परिणाम शेअरच्या किमतीत वाढ होण्यात होतो.
कोका-कोलाच्या शेअरमधील हा ऐतिहासिक चढ-उतार आजच्या जगात ब्रँडची प्रतिमा ही केवळ उत्पादनाच्या गुणवत्तेवर नाही, तर ती कोणाशी जोडलेली आहे यावरही अवलंबून असते हे दाखवून देणारा आहे. मेस्सीच्या एका साध्या विधानाने कोका-कोलाच्या तिजोरीत भर घातली, पण अशा प्रकारची वाढ ही अनेकदा ‘सेन्टीमेंट’वर आधारित असते. बाजारातील अशा तात्पुरत्या लाटांचा फायदा घेताना मूळ कंपनीच्या आर्थिक स्थितीचाही विचार करणे तितकेच आवश्यक आहे.
(लेखक शेअर बाजार अभ्यासक आहेत.)




























































