देशात 9 अमृत भारत एक्स्प्रेस गाड्या धावणार, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा

देशात लवकरच नवीन 9 अमृत भारत एक्स्प्रेस गाडय़ा सुरू केल्या जातील, अशी घोषणा केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. या नवीन गाडय़ांमुळे, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरयाणा, ओडिशा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामीळनाडू येथील सामान्य प्रवाशांना फायदा होईल, असे ते म्हणाले. या गाडय़ांमध्ये आधुनिक डिझाइन, सुधारित शॉक अॅब्झॉर्बर आणि प्रगत सुरक्षा फिचर्स आहेत. या गाडय़ांचे तपशीलवार मार्ग आणि वेळापत्रक लवकरच एका भव्य समारंभात जाहीर करण्यात येईल, असे ते यावेळी म्हणाले.

अमृत भारत एक्स्प्रेस सेवांचा एक नवीन संच पूर्व आणि उप-हिमालयीन प्रदेशांपासून दक्षिण, पश्चिम आणि मध्य भारतातील प्रमुख ठिकाणांपर्यंत रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढवेल. या नवीन अमृत भारत एक्स्प्रेस सेवा आसाम, बिहार आणि पश्चिम बंगालमधून जाणाऱया मार्गांवर सुरू केल्या जात आहेत. या प्रदेशांमध्ये मोठय़ा संख्येने स्थलांतरित कामगार वेगवेगळ्या राज्यात कामानिमित्त जात असतात. या नव्या रेल्वेत प्रवाशांना अनेक आधुनिक सुविधांचा लाभ घेता येईल, ज्यामध्ये फोल्डेबल स्नॅक टेबल, मोबाईल आणि बॉटल होल्डर, रेडियम फ्लोअर स्ट्रिप्स, आरामदायी सीट्स आणि बर्थ, इलेक्ट्रो-न्यूमॅटिक फ्लशिंगसह आधुनिक शौचालये, अग्निशामक यंत्रणा, फास्ट चार्ंजग पॉइंट्स आणि दिव्यांग प्रवाशांसाठी सुविधा यांचा समावेश आहे.

पहिली वंदे भारत स्लिपर ट्रेन धावली

देशातील पहिल्या वंदे भारत स्लिपर ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी हिरवा झेंडा दाखवला. ही ट्रेन कोलकाता ते गुवाहाटी दरम्यान 958 किमी अंतरापर्यंत धावणार आहे. या ट्रेनमध्ये एकूण 16 कोच आहेत. यात 11 थर्ड एसी, 4 सेकंड एसी आणि 1 फर्स्ट एसी कोच आहे. आधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. या ट्रेनचा वेग प्रति ताशी 180 किलोमीटर आहे. या ट्रेनमध्ये केवळ कन्फर्म तिकीट मिळतील. या ट्रेनचे भाडे 2 हजार रुपये ते 3 हजार 600 रुपयांपर्यंत ठेवण्यात आले आहे.

n अमृत भारत एक्स्प्रेस गाडय़ा विशेषतः नॉन-एसी स्लीपर क्लासमधील लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी डिझाइन केल्या आहेत. ट्रेनचं भाडं प्रति 1 हजार किमी अंतरासाठी 500 रुपये भाडे आकारले जाणार आहे.