दहावी, बारावी परीक्षा केंद्रांतील प्रत्येक खोलीत ‘सीसीटीव्ही’

गैरप्रकारमुक्त परीक्षेसाठी दहावी, बारावीच्या बोर्ड परीक्षा केंद्रांतील प्रत्येक वर्गखोलीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत राज्य मंडळाने निर्देश दिले आहेत. कोल्हापूर विभागातील 539 केंद्रांपैकी 324 म्हणजे 66 टक्के केंद्रांनी आजअखेर परीक्षेशी संबंधित प्रत्येक वर्गखोलीत कॅमेरे बसवले आहेत. उर्वरित 215 परीक्षा केंद्रांच्या संस्थाचालक व प्राचार्यांना बैठका घेऊन पुढील दहा दिवसांत कॅमेरे बसवण्याबाबत विभागीय मंडळाने सूचना दिल्या आहेत. यंदाही परीक्षा केंद्रांचे केंद्र संचालक व कर्मचारी यांची अदलाबदल करण्यात येणार आहे.

बारावीची परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत होणार आहे. तर, त्यापूर्वी तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा 23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत आयोजित केली आहे.

दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत होणार आहे. तर, तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा 2 ते 18 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे.

विभागीय मंडळस्तरावर संवेदनशील परीक्षा केंद्रांची यादी निश्चित करण्यात आली आहे. गैरप्रकार होऊ नये, यासाठी लक्ष देण्यात येणार आहे. संवेदनशील परीक्षा केंद्रांवरील सीसीटीव्हीचे ऑनलाइन फुटेज जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात येणार आहे. नियंत्रण कक्षाचीही स्थापना केली जाणार असून, याच कक्षातून कॅमेऱ्याद्वारे किती संवेदनशील परीक्षा केंद्रांना जोडता येईल, याबाबत तपासणी करण्यात येणार आहे. परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती या परीक्षा केंद्रांव्यतिरिक्त इतर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांत करण्यात येणार आहे. यंदा जिल्हास्तरीय दक्षता समितीचे पुनर्गठन करण्यात आले आहे. बोर्ड परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी मान्य व्यक्तींना आवाहन करण्याबाबत विनंती करण्यात येणार असल्याचे विभागीय सचिव सुभाष चौगुले यांनी सांगितले.

परीक्षेची सर्वसमावेशक तयारी सुरू आहे. शाळास्तरावरील तयारीची पाहणी क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत सुरू आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी सर्व त्या उपाययोजना केल्या जात आहेत, असे कोल्हापूर विभागीय मंडळाचे विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.