
ईव्हीएम हद्दपार करून मतपत्रिकेवर निवडणुका घेण्याची मागणी सातत्याने विरोधी पक्षांकडून होत असताना कर्नाटकच्या राज्य निवडणूक आयोगाने स्वतःहून हे पाऊल उचलले. राजधानी बंगळुरूसह 5 महानगरपालिकांच्या निवडणुका मतपत्रिकेवर होणार आहेत. ग्रेटर बंगळुरू प्राधिकरणा अंतर्गत या पाच पालिका असून 25 मे 2026नंतर या महानगरपालिकांच्या निवडणुका होतील. त्यात ईव्हीएमचा वापर होणार नाही, असे राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जी.एस. संग्रेशी यांनी स्पष्ट केले.
सुरुवातीपासून मतपत्रिकांचा वापर निवडणुकांमध्ये व्हायचा. मतदारांचा ईव्हीएमवर विश्वास राहिलेला नाही, असे कर्नाटक सरकारनेही म्हटले होते. मात्र गेल्या 20-30 वर्षांपासून ईव्हीएमचा वापर करण्यात येत आहे. मतपत्रिकांचा वापर करण्यास कायद्याने बंदी नाही किंवा सर्वोच्च न्यायालयानेदेखील तसा निर्णय दिलेला नाही. अमेरिकेसारख्या देशात मतपत्रिकांचा वापर करण्यात येतो, याकडे संग्रेशी यांनी लक्ष वेधले. राज्य सरकारच्या दबावाखाली हा निर्णय घेतला का, असे विचारले असता, निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. कायदेशीर तरतुदींनुसार निवडणुकांसाठी मतपत्रिका किंवा ईव्हीएमचा वापर करावा, याचा निर्णय घेण्याचा अधिकार आयोगाला आहे. ग्रेटर बंगळुरू प्राधिकरणाच्या कायद्यात मतपत्रिकांच्या वापराबाबत विशेष तरतूद आहे, असेही कुरेशी यांनी स्पष्ट केले. बंगळुरू शहरात मध्य, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या पाच पालिका आहेत. त्यात 88.91 लाख मतदार आहेत.
आयुक्त म्हणाले, सध्या मतपत्रिकांचा वापर योग्य
मतपत्रिकांचा वापर करणे, हा एक पर्याय आहे. दोन्ही पद्धतींमध्ये कोणतीही त्रुटी नाही. सखोल चर्चेनंतर आयोगाला वाटले, सध्याच्या परिस्थितीत हाच पर्याय सर्वोत्तम आहे. जगभरात त्याचा वापर होतो. आपल्या देशात आजही ग्रामपंचायत आणि विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी मतपत्रिकांचाच वापर होतो, असे कुरेशी म्हणाले.



























































