
16 व्या शतकाच्या आधीच्या असलेल्या आणि काही वर्षांपूर्वी त्या चोरीला गेलेल्या एकूण तीन मूर्ती अमेरिका हिंदुस्थानला परत करणार आहे. अमेरिकेचे नॅशनल म्युझियम ऑफ एशियन आर्ट स्मिथसोनियन इन्स्टिटय़ूशनने ही माहिती दिली आहे. या मूर्ती 16 व्या शतकातील असून त्या कांस्य धातूच्या आहेत.
संग्रहालयात ठेवलेल्या सर्व मूर्ती ‘शिव नटराज’ (चोळकाळ, अंदाजे 990), ‘सोमस्कंद’ (चोळकाळ, 12 वे शतक) आणि ‘संत सुंदरर विथ परावई’ (विजयनगर काळ, 16 वे शतक) यांच्या आहेत. या सर्व मूर्ती दक्षिण भारतीय कांस्य कला परंपरेनुसार बनवलेल्या आहेत. या मूर्ती पूर्वी तामीळनाडूतील मंदिरांमध्ये धार्मिक मिरवणुकीदरम्यान काढल्या जात होत्या. यापैकी एक चोळकालीन ‘शिव नटराज’ मूर्ती भारत सरकारसोबत झालेल्या करारानुसार दीर्घकालीन कर्जाच्या स्वरूपात अमेरिकेतच राहील, असे संग्रहालयाने सांगितले. करारानुसार संग्रहालय ही मूर्ती प्रदर्शित करत राहील. तसेच, या मूर्तींचा इतिहास, बेकायदेशीरपणे हटवणे आणि परत मिळवण्याबद्दलची संपूर्ण माहितीदेखील सामायिक करणार आहे. स्थानिक तस्करांनी या मूर्ती चोरून हिंदुस्थान बाहेर पोहोचल्या होत्या.


























































