मुंबई-गोवा महामार्गावर टायर फुटून कारचा भीषण अपघात; सुदैवाने पाचही पर्यटक बचावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई-गोवा महामार्गावरील कणकवली शहरातील उड्डाणपुलावर रविवारी सकाळी एका कारचा भीषण अपघात झाला. धावत्या कारचे टायर अचानक फुटल्याने हा अपघात घडला. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असले तरी, सुदैवाने कारमधील पाचही पर्यटक सुखरूप बचावले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून गोव्याच्या दिशेने पाच पर्यटक कारने जात होते. रविवारी सकाळी ही कार कणकवली येथील पल्लवी लॉज समोरील उड्डाणपुलावर आली असता, अचानक गाडीचे टायर फुटले. टायर फुटल्यामुळे चालकाचा ताबा सुटला आणि कारला अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की कारच्या दोन्ही बाजूंच्या एअरबॅग उघडल्या गेल्या, ज्यामुळे प्रवाशांचे प्राण वाचले.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस कर्मचारी सुभाष शिवगण, महामार्ग वाहतूक पोलीस हर्षल खडपकर, योगेश लाड आणि दत्तात्रय राऊत यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने मदतकार्य राबवून पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढले आणि वाहतूक सुरळीत केली. कारचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असले तरी, कोणतीही जीवितहानी न झाल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला आहे.