
राष्ट्रवादी काँग्रेसचे एकीकरण व्हावे अशी कार्यकर्त्यांची भावना असतानाही काही नेते त्यात खोडा घालत आहेत. त्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा प्रामुख्याने हात असल्याचा आरोप आहे. कारण अजित पवार यांच्या गटात आर्थिक गैरव्यवहारांचे सर्वाधिक आरोप या दोघांवर असून सत्तेत राहिलो नाही तर ईडी बोकांडी बसेल या भीतीनेच तटकरे, पटेल यांच्याकडून एकीकरणाला विरोध होत असल्याचे राष्ट्रवादीतीलच सूत्रांनी सांगितले. तटकरे आणि पटेल यांनी ईडीच्या भीतीनेच अजित पवारांसह भाजपबरोबर हातमिळवणी केली होती. सत्तेत असतानाही अनेकदा भाजपने या दोघांविरुद्ध कारवाईच्या हालचाली सुरू केल्या होत्या, परंतु अजितदादांचे संरक्षक कवच लाभल्याने ते सतत बचावले, अशी चर्चा आहे.
एकीकरणाचा भाजपलाही धोका
राष्ट्रवादीचे एकीकरण झाले तर शरद पवार यांच्या धोरणानुसार ते भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार नाहीत. विरोधी पक्षातच राहण्यास प्राधान्य देतील. परिणामी विरोधी पक्षातील महाविकास आघाडीची ताकदही वाढून विरोधी पक्षनेता नेमणे सरकारला भाग पडेल. त्यात भाजपवाले आपल्यामागे पुन्हा ईडीचा तगादा लावतील या भीतीपोटीच तटकरे, पटेल हे सत्ता सोडून शरद पवारांसोबत जाण्यास तयार नाहीत, असे सूत्रांनी सांगितले.


























































