
>> मच्छिंद्र ऐनापुरे
काळाची गती आज इतकी वेगवान झाली आहे की, बदल ही आता अपवादात्मक घटना राहिलेली नाही, तर तोच जगण्याचा स्थायी स्वभाव बनला आहे. तंत्रज्ञान, रोजगार, जीवनशैली, विचारसरणीच्या सर्व क्षेत्रांमध्ये होत असलेले आमूलाग्र बदल माणसाला सतत नव्याने विचार करायला भाग पाडत आहेत. अशाच एका महत्त्वाच्या बदलाच्या वळणावर आज आपली शिक्षण व्यवस्था आणि करिअरविषयक संकल्पना उभी आहे.
दीर्घकाळ समाजात खोलवर रुजलेली एक धारणा अशी होती की, आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर मोठी पदवी, प्रतिष्ठत महाविद्यालय आणि त्यानंतर चांगली नोकरी-हा एकमेव मार्ग आहे. मात्र आज ही धारणा हळूहळू ढासळू लागली आहे. आज सर्वत्र एक प्रश्न गंभीरपणे विचारला जात आहे-केवळ पदवी मिळवणे पुरेसे आहे का? हा प्रश्न त्या कोटय़वधी विद्यार्थी आणि पालकांसाठी अधिक अस्वस्थ करणारा ठरत आहे.
पूर्वी शाळा आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर मिळणारे प्रमाणपत्र म्हणजे उज्ज्वल भविष्याची किल्ली मानली जात होती. एकदा ती किल्ली हातात आली की नोकरी, स्थैर्य आणि सामाजिक प्रतिष्ठा आपोआप मिळेल, असा विश्वास होता. मात्र आज ही किल्ली पूर्वीसारखी झळाळत नाही. कारण जग आता अशा दिशेने पुढे जात आहे, जिथे “तुम्हाला काय येते?’’ आणि “ते काम तुम्ही किती चांगल्या पद्धतीने करू शकता?’’ याला अधिक महत्त्व दिले जात आहे. आजच्या स्पर्धात्मक जगात केवळ प्रमाणपत्र पुरेसे ठरत नाही. अनुभव, कौशल्य, समस्या सोडवण्याची क्षमता, नवे विचार-हे घटक अधिक निर्णायक ठरत आहेत. त्यामुळेच पदवी असतानाही अनेक तरुण बेरोजगार आहेत, तर पदवी नसलेले, पण कौशल्यसंपन्न तरुण स्वतःचा मार्ग यशस्वीपणे घडवताना दिसतात.
भारताच्या शिक्षण व्यवस्थेचा इतिहास पाहिला, तर ब्रिटिश काळात राबवली गेलेली तथाकथित ‘मॅकॉले शिक्षण पद्धती’ आजही अनेक अंशी आपल्यावर प्रभाव टाकताना दिसते. या पद्धतीचा उद्देश विद्यार्थ्यांना विचारशील, सर्जनशील बनवण्यापेक्षा सरकारी आणि खासगी कार्यालयांसाठी शिस्तबद्ध कर्मचारी घडवणे हा होता. सर्वांना एकाच साच्यात घालण्याचा हा प्रयत्न होता. या व्यवस्थेमध्ये विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक आवडी, त्यांच्या लपलेल्या प्रतिभा, त्यांच्या स्वप्नांना फारशी जागा नव्हती. अभ्यासक्रम पूर्ण करा, परीक्षा पास व्हा आणि नोकरीला लागा-इतकीच अपेक्षा होती. मात्र आजचा काळ ही चौकट मोडून काढत आहे.
शिक्षणातील नवे बदल
अलीकडच्या काळात भारताच्या शिक्षण व्यवस्थेत जे बदल घडवून आणले जात आहेत, त्यामागचा मुख्य उद्देश ही जुनी मानसिकता बदलण्याचाच आहे. शिक्षणमंत्र्यांनीही स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की देशाला आता केवळ पदव्या वाटणाऱ्या संस्थांची नव्हे, तर कौशल्य घडवणाऱया प्रशिक्षण केद्रांची गरज आहे. आज आंतरराष्ट्रीय कंपन्या नोकरी देताना उमेदवाराच्या पदवीपेक्षा त्याच्या कौशल्यांकडे अधिक लक्ष देतात. “तुम्ही कोणत्या कॉलेजमधून शिकला?’’ किंवा “कोणत्या वर्षी पदवी घेतली?’’ यापेक्षा “तुम्ही आमच्या समस्यांचे समाधान करू शकता का?’’ हा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरत आहे. त्यामुळेच मोठी पदवी नसली तरी मेहनत, सातत्य आणि कौशल्याच्या जोरावर अनेक तरुण यशाच्या उच्च शिखरांवर पोहोचत आहेत.
‘शिकणे कधीच वाया जात नाही’ ही नवी जाणीव
पूर्वी एखाद्या विद्यार्थ्याने काही कौटुंबिक, आर्थिक किंवा वैयक्तिक अडचणींमुळे महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडले, तर त्याला अपयशी समजले जात होते. त्याची मागील वर्षे वाया गेली, अशी भावना निर्माण होत असे. मात्र आता ही दृष्टी बदलली आहे. नव्या शिक्षणरचनेमुळे विद्यार्थ्याचा एकही दिवस वाया जाणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. एक वर्ष शिक्षण घेतल्यास प्रमाणपत्र, दोन वर्षांनंतर डिप्लोमा-अशी टप्प्याटप्प्याने मान्यता दिली जात आहे. ही बाब केवळ शैक्षणिक नाही, तर मानसिकदृष्टय़ाही दिलासा देणारी आहे. कारण यातून हे मान्य केले गेले आहे की शिकणे कधीही व्यर्थ जात नाही आणि प्रत्येक अनुभव माणसाला अधिक सक्षम बनवतो. या बदलांमुळे विद्यार्थ्यांवरील मानसिक दबाव मोठय़ा प्रमाणात कमी झाला आहे. ‘काहीही झाले तरी सलग तीन-चार वर्षे शिक्षण पूर्ण केलेच पाहिजे’ हा ताण आता राहिलेला नाही. विद्यार्थी आपल्या गरजेनुसार, परिस्थितीनुसार शिक्षण घेऊ शकतात, थांबू शकतात आणि पुन्हा परत येऊन पुढे शिपू शकतात. ही लवचिकता शिक्षणाला अधिक मानवी बनवते.
कौशल्य विकास – काळाची गरज
भारतासारख्या विशाल देशात, जिथे दरवर्षी लाखो तरुण शिक्षण पूर्ण करून बाहेर पडतात, तिथे सर्वांनाच सरकारी नोकऱया मिळणे अशक्य आहे. त्यामुळेच कौशल्य विकास हा आज केवळ पर्याय नसून गरज बनला आहे. शाळांमध्ये सहावीपासूनच संगणक कोडिंग, विद्युत काम, सुतारकाम, हस्तकला यांसारख्या गोष्टी शिकवल्या जात आहेत. पूर्वी या कामांकडे कमीपणाने पाहिले जात होते. मात्र आज ही समजूत बदलत आहे की कोणतेही काम छोटे किंवा मोठे नसते; ते किती कुशलतेने केले जाते, हेच खरे महत्त्वाचे असते. त्यामुळे एक उत्तम कारागीर, मेकॅनिक किंवा कलाकार हा अनेकदा सरासरी पदवीधारकापेक्षा अधिक समाधानी आणि यशस्वी जीवन जगतो.
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी गुण
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आल्याने पदव्यांचे पारंपरिक महत्त्व आणखी कमी झाले आहे. जी कामे पूर्वी वर्षानुवर्षे अभ्यास करून शिकावी लागत होती, तीच कामे आता संगणक काही सेकंदांत अचूकपणे करत आहेत. अशा वेळी माणसाने ती कौशल्ये विकसित करणे गरजेचे आहे, जी यंत्रे कधीच करू शकणार नाहीत-सर्जनशीलता, संवेदनशीलता, संघभावना, नैतिक निर्णयक्षमता. ही गुणवैशिष्टय़े पुस्तक पाठ करून मिळत नाहीत. ती अनुभवातून, चुका स्वीकारून, सातत्यपूर्ण प्रयत्नांतून विकसित होतात. म्हणूनच भविष्यातील शिक्षणात ‘काय शिकायचे’ यापेक्षा ‘कसे शिकायचे’ हे अधिक महत्त्वाचे ठरणार आहे. आज प्रत्येकाला आयुष्यभर शिकणारा विद्यार्थी बनावे लागणार आहे. कारण आजचे नवे तंत्रज्ञान उद्या जुने होणार आहे. पदवी काही काळासाठी उपयोगी ठरते, पण कौशल्य आयुष्यभर साथ देते.
एपूणच पाहता, पदवी पूर्णपणे नाहीशी होणार नाही; मात्र तिचे जुने, अंतिम ध्येयाचे स्वरूप नक्कीच संपुष्टात येईल. ती आता करिअरची सुरुवात असेल, शेवट नाही. एखाद्या व्यक्तीची खरी ओळख ही त्याने प्रत्यक्ष कामातून काय साध्य केले आहे, यावर ठरणार आहे. आता कागदोपत्री प्रमाणपत्रांचा जड बोजा खांद्यावरून उतरवून, कौशल्याच्या पंखांना भरारी देण्याची वेळ आली आहे. कारण शिक्षणाचा खरा अर्थ हाच आहे आणि तो म्हणजे माणसाला आत्मनिर्भर, सजग आणि जबाबदार नागरिक बनवणे.






























































