
मुंबई-पुणे महामार्ग गेल्या 22 तासांहून अधिक वेळ बंद आहे. ओडोशी बोगद्यावर प्रोपेलिस गॅसची वाहतूक करणारा टँकर उलटल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या आणि मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. काल रात्रीपासून वाहने घाटामध्ये अडकून आहेत. अजून वाहतूककोंडी सुरू आहे. या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्या सर्व बसेस रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रोपलिन गॅसचा टँकर उलटल्याने टँकरमधून गॅस लिकेज सुरू आहे. टँकरमधील गॅस दुसऱ्या टँकरमध्ये ट्रान्सफर केल्यानंतर अपघातग्रस्त टँकर बाजुला करण्यात येईल, अशी माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे. परंतू या प्रक्रियेसाठी किती वेळ लागणार याची ठोस माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे मागील 22 तासांपासून 30 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. लहाणांपासून, वयस्कर व्यक्तीपर्यंत सर्वजन या वाहतूक कोंडीत अडकून पडले आहेत. एसटी महामंडळाच्या अनेक बसेस सुद्धा या वाहतूक कोंडीत अडकून आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या सर्व बसेस रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू होण्यासाठी किती वेळ लागेल, याची माहिती अजूनही देण्यात आलेली नाही. त्यामुळे मुंबई-पुणे महामार्गावरून प्रवास टाळावा आणि पर्यायी मार्गाचा वापर करावा, अशा सुचना वाहतूक पोलिसांनी दिल्या आहेत.



























































